मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

दापोलीत कौटुंबिक वाद उफाळला; सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार

परस्परविरोधी तक्रारी : ५ जणांवर गुन्हा दाखल

दापोली : तालुक्यातील साकुर्डे येथे सकपाळ कुटुंबातील जुना वाद उफाळून आला आहे. दोन भाऊ एकमेकांचे वैरी झाले आहेत. दोघांमधील वाद विकोपाला गेला असून, एकाच रात्री दोन परस्परविरोधी गुन्हे दापोली पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात एकूण ५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, कौटुंबिक वादातून घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे साकुर्डे गावात भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहिली घटना २८ मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. अश्विनी अशोक सकपाळ (३५, रा. जालगाव पांगारवाडी, मूळ रा. साकुर्डे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या, त्यांचे पती अशोक सकपाळ आणि दोन मुली साकुर्डे येथील त्यांच्या मूळ घरी जेवण्यासाठी बसल्या होत्या. त्याचवेळी आरोपी मारुती शांताराम सकपाळ, अमित मारुती सकपाळ, मोहन सकपाळ (सर्व रा. साकुर्डे) आणि राजू सातारकर (रा. दापोली) हे घरात घुसले. त्यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. मारुती सकपाळ याने कुऱ्हाडीच्या लाकडी दांड्याने अशोक सकपाळ यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूस मारून जखमी केले. त्यानंतर अश्विनी यांनाही मारहाण करून त्यांचा गळा पकडून ढकलून दिले. अमित सकपाळ याने “या सर्वांना जिवे ठार मारून टाका” अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मारुती सकपाळ, अमित सकपाळ, मोहन सकपाळ आणि राजू सातारकर या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दुसरी घटना त्याच रात्री घडली, ज्यात भावानेच भावावर कुऱ्हाडीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची तक्रार दाखल झाली आहे. मारुती शांताराम सकपाळ (वय ४३, रा. कुंभारखाणवाडी, साकुर्डे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २८ मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ते साकुर्डे येथील त्यांच्या दुकानात असताना त्यांचा भाऊ अशोक शांताराम सकपाळ तेथे आला आणि त्याने शिवीगाळ केली. यानंतर मारुती, “मला शिवीगाळ का केली?” असा जाब विचारण्यासाठी अशोकच्या घरी गेले असता, अशोकने घरातील पडवीत असलेली कुऱ्हाड उचलून मारुती यांच्यावर हल्ला केला. कुऱ्हाडीचा पहिला वार मारुती यांच्या खांद्याला केला. दोघांमध्ये झटापट सुरू असताना अमोल शिरगावकर आणि राम शिरगावकर भांडण सोडवण्यासाठी धावले. त्यानंतर अशोकने दुसरी कुऱ्हाड घेऊन मारुती यांच्या उजव्या दंडावर दुसरा वार केला. या तक्रारीवरून पोलिसांनी अशोक सकपाळ याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही परस्परविरोधी गुन्ह्यांचा पुढील तपास सहाय्यक फौजदार प्रकाश मोरे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!