मुख्य बातमी

मंडणगड येथील लाचप्रकरणी मंडळ अधिकारी, तलाठ्यासह शिपायाला पोलीस कोठडी

रत्नागिरी : मंडणगड येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत मंडळ अधिकारी, तलाठी आणि एका शिपायास लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदारांनी त्यांच्या पत्नीच्या नावावर मौजे शेणाळे (ता. मंडणगड) येथे लिलावातून शेतजमीन खरेदी केली होती. या जमिनीची फेरफार नोंद करून सातबारा उतारा मिळवण्यासाठी त्यांनी संबंधित मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याशी संपर्क साधला. हे काम करून देण्यासाठी उप कोषागार कार्यालयातील शिपाई मारुती भोसले याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी ४५ हजार रुपये भोसले याने ऑनलाइन स्वीकारले होते; मात्र संपूर्ण रक्कम न मिळाल्याने मंडळ अधिकाऱ्याने फेरफार नोंद रद्द केली होती.

यानंतर, तक्रारदाराने २७ मे रोजी म्हाप्रळचे मंडळ अधिकारी अमित शिगवण, ग्राम महसूल अधिकारी, सजा म्हाप्रळ, अतिरिक्त कार्यभार सोवेली श्रीनिवास श्रीरामे आणि मारुती भोसले यांची भेट घेतली. यावेळी प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी मंडळ अधिकारी अमित शिगवण याने तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांची लाच मागितली. एसीबीने केलेल्या पडताळणी कारवाईदरम्यान ही मागणी करण्यात आली.

तक्रारदाराकडून ३० हजार रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताना अमित शिगवण याने स्वतःसाठी १५ हजार ५०० रुपये ठेवून उर्वरित १४ हजार ५०० रुपयांचा हिस्सा तलाठी श्रीनिवास श्रीरामे यांना दिला.

या लाचखोरी प्रकरणी मंडळ अधिकारी अमित शिगवण, ग्राम महसूल अधिकारी श्रीनिवास श्रीरामे आणि शिपाई मारुती भोसले यांना पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आले. मंडणगड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद क्रमांक २०/२०२५ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (संशोधन २०१८) च्या कलम ७, ७ अ, १२ अंतर्गत २८ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींना काल (२९ मे) अति. सत्र व विशेष न्यायाधीश, खेड यांच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना तपासकामी ३१ मेपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!