रा. भा. शिर्के प्रशालेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा. भा. शिर्के प्रशाला, श्रीमान मंगेश बापूजी तोरगलकर ज्युनि.कॉलेज आणि ॲड. बाबासाहेब नानल गुरुकुल प्रकल्पातील शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील इयत्ता दहावी व बारावीमधील विशेष प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ २० जून रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. विलास पाटणे, संस्थेचे उपकार्याध्यक्ष ॲड. विजय साखळकर, नियामक मंडळाचे सदस्य व शाळा समिती सदस्य सचिन वहाळकर, नियामक मंडळ सदस्य डॉ. श्री. केतकर, संतोष गुरव, कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक दत्तात्रय वालावलकर, संस्थेचे आजीव सभासद विनोद मयेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक के. डी. कांबळे, उपमुख्याध्यापिका सौ. पवार, पर्यवेक्षिका सौ. कांबळे, ज्येष्ठ शिक्षक श्री. लिंगायत, माजी मुख्याध्यापिका सौ. गुळवणी, माजी मुख्याध्यापक सी. एस. पाटील, माजी शिक्षिका श्रीमती बागवे, माजी शिक्षक श्री. रहाटे, तसेच प्रशालेतील शिक्षक – शिक्षकेतरवृंद, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

प्रारंभी मुख्याध्यापक श्री. कांबळे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून प्रास्तविक केले. यानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, भेटवस्तू व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच विशेष अंगमेहनत आणि योगदानामुळे प्रशालेच्या सर्व सेवकांनाही श्री. साखळकर यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन कौतुक करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन करताना ॲड. साखळकर यांनी प्रशालेची शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशालेच्या शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त माजी विद्यार्थ्यांची यशस्वी गरुडझेप अधोरेखित केली. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी विद्यार्थ्यांना मेहनत आणि अभ्यासातील सातत्य याचे महत्त्व पटवून देताना एलन मस्क, लक्ष्मी पिचई आणि सुंदर पिचई या विश्वविख्यात कर्तृत्ववान व यशाच्या सर्वोच्च शिखरावरील व्यक्तीमत्वांची आणि त्यांच्या अपार कष्ट, जिद्दीची माहिती सांगितली. प्रशालेच्या उज्ज्वल यशाची परंपरा अखंड राखल्याबद्दल सर्व शिक्षकवृंदांचे अभिनंदन आणि कौतुकही केले.
इयत्ता दहावी परीक्षेत १०० टक्के गुण मिळवणारा ओजस पाध्ये व पालक सौ. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
गुणगौरव समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या वरिष्ठ शिक्षिका श्रीमती वीणा काजरेकर यांनी केले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या पारितोषिकांचे वाचन श्रीनिवास जोशी यांनी, तर शिर्के प्रशालेच्या पारितोषिकांचे वाचन सौ. सप्रे यांनी केले.
प्रशालेच्या पारितोषिक वितरण समिती प्रमुख सौ. दुदगीकर, सौ. सप्रे, पी. सी. जाधव, श्री. पाटील, श्री. पांढरे त्याचबरोबर सांस्कृतिक विभाग व स्वराज्य सभा विभागातील सर्व शिक्षक यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक आर. वाय. कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले.



