मुख्य बातमी

पणजी येथे १६ सप्टेंबरला ‘डाक अदालत’चे आयोजन; ११ सप्टेंबरपर्यंत तक्रारी पाठवण्याचे आवाहन

रत्नागिरी : पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्रीय कार्यालय, पणजी यांच्या वतीने क्षेत्रीय स्तरावरील ‘डाक अदालत’चे आयोजन १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. ही अदालत पणजी येथील पोस्टमास्तर जनरल यांच्या कार्यालयात पार पडणार आहे.

पोस्टाच्या कार्यपद्धतीविषयी किंवा कामकाजाबाबत ज्या तक्रारींचे निराकरण सहा आठवड्यांच्या आत झालेले नाही अथवा समाधानकारक उत्तर मिळालेले नाही, अशा प्रलंबित तक्रारींची दखल या डाक अदालतीमध्ये घेतली जाईल. यामध्ये प्रामुख्याने टपाल, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक आणि मनीऑर्डर यांसंबंधीच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील.

नागरिकांना दर्जेदार सेवा देणे आणि त्यांच्या तक्रारींचे प्रत्यक्ष अधिकाऱ्यांमार्फत तत्परतेने निवारण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

तक्रारदारांनी आपल्या तक्रारीचा सविस्तर तपशील (उदा. तारीख, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार पाठवली होती त्यांचे नाव व पत्ता इत्यादी) नमूद करणे आवश्यक आहे. तक्रार अर्जाची अतिरिक्त प्रत जोडून तो ‘सहाय्यक डाक निदेशक-१, गोवा क्षेत्रीय कार्यालय, पणजी – ४०३००१’ यांच्या नावे ११ सप्टेंबरपर्यंत किंवा तत्पूर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवावा. ११ सप्टेंबरनंतर प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!