कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई संस्थेची चिंतन सभा संपन्न

मुंबई : कलगी तुरा लोककला संवर्धनार्थ गेली ६१ कार्यरत असणारी कोकणातील शाहिरी परंपरेतील अग्रगण्य संस्था कलगी तुरा समाज उन्नती मंडळ -मुंबई संस्थेचे स्नेहसंमेलन व चिंतन सभा २१ व २२ जून २०२५ रोजी कार्यकारणी, जेष्ठ शाहिरी मार्गदर्शक मंडळी यांच्या उपस्थितीत पालघर येथे झाली.
या सभेत गेल्या तीन वर्षांत केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. कलाकारांना कला सादरीकरणास भेडसावणाऱ्या समस्या आणि संस्थेच्या नियम आणि अटी शर्थी यांचे कलाकार शाहीर मंडळींनी पालन करून आपल्या पूर्वजांनी जोपसलेली कलगीतुरा ही लोककला तिची मातृसंस्था भविष्यात सुद्धा अशीच मोठ्या वैभवाने चालत राहावी यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रामाणिकपणे काम करण्याचे ठरविण्यात आले. तसेच संस्थेच्या कार्यकारणीचा कालावधी संपल्यामुळे पुढील कार्यकारणीची रचना कशी असावी याची सर्वानुमते सविस्तर चर्चा करण्यात आली.
या चिंतन सभेसाठी संस्थेचे अध्यक्ष अनंत तांबे, उपाध्यक्ष सुरेश ऐनारकर, सुरेश चिबडे, सरचिटणीस संतोष धारशे, चिटणीस सुधाकर मास्कर, खजिनदार सत्यवान यादव, सदस्य सुरेश कदम, दीपक म्हादे, वादविवाद समिती उपाध्यक्ष चंद्रकांत धोपट, सदस्य दामोदर गोरीवले, दिलीप नामे, उदय चिबडे आणि संस्थेचे जेष्ठ माजी अध्यक्ष चंद्रकांत गोताड, माजी सरचिटणीस नारायण चापडे व प्रचार प्रमुख उदय दणदणे यांनी उपस्थित राहून चर्चा सत्रात भाग घेतला.
उपस्थित पदाधिकारी आणि वरिष्ठ मंडळी यांचे स्वागत आणि आभार सरचिटणीस संतोष धारशे यांनी केले केले. उपस्थितांनी या चर्चेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्यामुळे ही चिंतन सभा यशस्वीरित्या संपन्न झाली.


