मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

आणीबाणीत लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते, यावरही संघ कार्यकर्त्यांनी मात केली

गुहागरचे मुकुंद तथा नाना पाटणकर यांनी दिल्या जुन्या आठवणींना उजाळा

आबलोली (संदेश कदम) : आणीबाणीच्या काळ्या दिवसाला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर गुहागर तालुका भाजप कार्यकर्त्यांनी मुकुंद पाटणकर तथा नानांची भेट घेवून त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला आणि त्यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी त्यांनी आणीबाणीच्या काळात संघाची सुप्त शक्ती कसे काम करत होती याची आठवण करून जुन्या आठवणींना उजाळा देऊन याची माहिती सर्वांना दिली.

यावेळी बोलताना नाना पाटणकर म्हणाले की, “गुहागरातील अण्णा दामले, तात्या वझे, मधुकाका परचुरे, केशवकाका भावे, पांडुरंगशेठ तथा दादा शिरगांवकर, दांडेकर सर आदी ७ जणांना मिसा खाली अटक झाली होती. तर सुशीलाबाई खरे, प्रमोदकाका सैतवडेकर, शशिनाना बिर्जे अशा काहीजणांना आणीबाणी विरोधात सत्याग्रह केला म्हणून अटक झाली होती. दादा शिरगांवकर यांची ४ दिवसाच्या पॅरोलवर सुटका होवून ते पालशेतला आले. पण घरी बसले नाहीत. अटक केलेल्या सर्वांच्या घरी भेटण्यासाठी आम्ही प्रवास केला. असोरेतील पद्माकर निमकर यांच्या घरी गेलो तेव्हा निमकरांच्या घराचे दार मोटरसायकलच्या आवाजाने बंद झाले होते. अखेर पांडुरंगशेठ तथा दादा शिरगावकरांनी वहिनींना नेहमीच्या पठडीतील हाक मारली तेव्हा घराचे दरवाजे उघडले. पण दादा नेमका काय निरोप घेऊन आले असतील असा विचार करत, थरथर कापत वहिनी ओटीच्या दारात उभ्या होत्या. ही होती आणीबाणीची दहशत.”

मधुकाकांचा किस्सा सांगताना नाना म्हणाले की, “आपल्याला अटक होणार याची कुणकुण लागताच मधुकाका पोलिसांचा ससेमिरा चुकवून मुंबईला त्यांच्या भावाकडे ग. पां. परचुरे यांच्याकडे घरी गेले. तिथे झालेल्या गप्पांमध्ये पोलिसांना शरण जाण्याचा निर्णय झाला; मात्र मुंबईत पोलिसांना शरण न जाता मधुकाका पुन्हा चलाखीने गुहागरला आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. संघाचे पदाधिकारी असलेले दांडेकर सर यांना पोलिसांनी अटक केली. पोलिसी अत्याचाराची माहिती असूनही त्यावेळी विचलित न होता दांडेकर सर निधड्या छातीने पोलिसांबरोबर गेले.”

सदाशेठ आरेकरांविषयी बोलताना नाना म्हणाले की, “याकाळात काँग्रेसचे गुहागरमधील प्रभावी नेते सदाशेठ आरेकर यांची भूमिका कौतुकास्पद होती. ठरविले असते तर सदाशेठ आपल्या विरोधकांना धडा शिकवू शकले असते. मात्र तसे न करता सदाशेठ यांनी गुहागर पोलिस ठाण्यात निरोप दिला होता. तुम्ही अटक करत असलेली मंडळी ही गुहागर तालुक्यातील प्रतिष्ठित मंडळी आहेत. अटक करताना त्यांचा अपमान करू नका. कोठडीत त्यांना मारहाण होता कामा नये.”

“जनजागृतीसाठी सायक्लोस्टाईलवर गुप्तपणे पत्रके काढायची आणि ती तितक्याच गुप्तपणे वितरीत करायची, असे एक आवाहनात्मक काम तेव्हा संघ कार्यकर्त्यांना करावे लागत असे. गुहागरमध्ये हे मशीन उपलब्ध नव्हते. मग दाभोळ खाडीमार्गे दापोलीत जावून ते मशीन आणायचे. त्यासाठी लागणाऱ्या शाईच्या ट्यूब मिळवाच्या. आपल्या तालुक्यासाठी आवश्यक असतील तेवढ्या पत्रकांची छपाई करायची. त्यानंतर पुन्हा दापोलीत ते मशीन सुखरूप पोच करायचे. यामध्ये गुप्तता ही पाळावी लागायची. आणीबाणीच्या काळात संघाचे प्रचारक कै. वसंतराव केळकर नानांच्या घरी शरद गोखले या नावाने १५ दिवस राहत होते. त्या काळात अचानक निरोप यायचा अमुक ठिकाणी अमुक माणुस उभा आहे त्याला अमुक ठिकाणी पोचवा. अशा अचानक येणाऱ्या कामांबरोबरच अटक झालेल्यांच्या घरी संपर्क, गुप्तपणे चालणाऱ्या शाखांवर प्रवास तसेच हा कठीण काळही निघून जाईल हा आत्मविश्र्वास समाजात निर्माण करण्याचे कामही देशातील संघ कार्यकर्ते करत होते. आम्ही जे काही केले ते समाजासाठी केले. संघ शरण भावनेने केले,” असेही नानांनी सांगितले.

यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, उपाध्यक्ष मंगेश रांगळे, माजी नगरसेवक उमेश भोसले, तालुका कार्यकारीणी सदस्य संतोष सांगळे, भाजयुमाचे शहर अध्यक्ष मंदार पालशेतकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!