ठाकरे शिवसेनेतर्फे रत्नागिरीत आनंदोत्सव साजरा

रत्नागिरी : राज्य सरकारच्या अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्ती विरोधात ठाकरे बंधुंनी पुकारलेल्या आंदोलनाला यश आले असून, या आंदोलनाचा धसका घेऊन राज्य शासनाने हिंदी भाषेच्या सक्तीचा शासन निर्णय (GR) अखेर रद्द केला. यानिमित्ताने आज (३० जून) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, राम आळी, मारुती मंदिर, साळवी स्टॉप शाखा आदी ठिकाणी फटाके वाजवत आणि घोषणाबाजी करण्यात आली.
राज्य शासनाने इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेतला होता. त्याला राज्यभरातून शिवसेनेने कडाडून विरोध केला होता. या निर्णयाविरोधात ५ जुलैला शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांच्या वतीने संयुक्त मोर्चा काढण्यात येणार होता; मात्र राज्यभरातून या निर्णयाला होत असलेला विरोध लक्षात घेऊन मोर्चाला यश मिळेल, हे राज्य सरकारच्या लक्षात आल्याने हा शासन निर्णय रद्द करावा लागला.

हा मराठी भाषेच्या एकजुटीचा हा विजय असून, हा आनंदोत्सव रत्नागिरीत साजरा करण्यात आला. या प्रसंगी शिवसेना उपनेते बाळ माने, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, शहर संघटक प्रसाद सावंत, माजी नगरसेविका सौ. रशिदा गोदड, सौ. राजश्री शिवलकर, बिपीन शिवलकर यांच्यासह शाखाप्रमुख, महिला पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




