आगरी समाजसेवा मंडळ अलिबागतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

अलिबाग (राजेश बाष्टे) : येथील आगरी समाजसेवा मंडळातर्फे आगरी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा २९ जून रोजी भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय अलिबाग येथे पार पडला. सुरुवातीला दीपप्रज्वलनाने आणि गेल्या वर्षभरात निधन पावलेल्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आपल्या प्रास्ताविकामध्ये मंडळाचे अध्यक्ष विलास ठाकूर यांनी मंडळ राबवत असलेल्या समाजपयोगी कार्याची माहिती उपस्थितांना करून दिली.
या कार्यक्रमाला जेएसएम महाविद्यालयाचे प्रा. मिलिंद प्रभाकर धोदरे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात दहावीनंतरच्या विविध अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली आणि भविष्यात येणाऱ्या आर्टिफिशिएल इंटेलिजन्स बद्दल योग्य ते मार्गदर्शन आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत करून दिले. पारितोषिक वितरणासाठी सौ. स्वाती म्हात्रे यांनी संचालन केले आणि सौ. चित्रा भोईर, सौ. सुनिला कोठेकर, सौ. कल्पना वाकडीकर आणि प्रदीप पाटील यांनी यासाठी मदत केली.
या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या देणगीदारांनी आपली देणगी मंडळाकडे सुपूर्द केली त्या सर्वांचा यथोचित सत्कार या निमित्ताने करण्यात आला. या कार्यक्रमासाठी भाग्यलक्ष्मी हॉल नाममात्र किंमतीमध्ये उपलब्ध करून दिल्याबद्दल राकेश थळे यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थी आणि पालकांनी आपले मनोगत व्यक्त करताना मंडळ करीत असलेल्या कार्याची प्रशंसा केली. या वेळी मंचावर उपाध्यक्ष सुनील कोठेकर, सचिव शशांक म्हात्रे, मंगेश भगत तसेच इतर सर्व कार्यकारी सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्याध्यक्ष रमेश म्हात्रे यांनी केले.आभार प्रदर्शन सौ. अनुपमा चवरकर यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आगरी समाजसेवा मंडळातील सर्व सदस्यांनी आणि मंडळाच्या सर्व भगिनींनी मोलाची मदत केली. हा गुणगौरव कार्यक्रम गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाला एक नवीन ऊर्जा देऊन त्यांना शैक्षणिक बळ देणारा ठरला. राष्ट्रागीताने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.



