भाजपा खेडतर्फे “एक पेड माँ के नाम” पर्यावरण संवर्धनाचा संकल्प

खेड : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘एक पेड़ माँ के नाम’ (आईच्या नावाने एक झाड) ही मोहीम सुरू केली आहे, या आवाहनानुसार, जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी (भाजपा) खेड यांच्या वतीने खेड-भरणे रोड येथे वृक्ष लागवड करण्यात आली. “एक वृक्ष, एक जीवन” या संकल्पनेला बळ देत अधिकाधिक वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा,असा संदेश यावेळी देण्यात आला.

भाजपा नेते तथा खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. प्रत्येकाने आपल्या आईच्या सन्मानार्थ एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला. यावेळी पर्यावरणप्रेमी, सर्व सामाजिक संस्था, उच्च माध्यमिक शाळा, रिक्षा संघटना, आणि नागरिकांना वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धन ही केवळ एका दिवसाची जबाबदारी नसून ती प्रत्येकाच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली पाहिजे, असे प्रतिपादन ॲड. खेडेकर यांनी यावेळी केले.



