मुख्य बातमी

कम्युनिटी सेंटरच्या नावाने बौद्धविहार बांधण्यास समाजाचा विरोधच

बौद्धविहार संघर्ष समितीचा आक्रमक पवित्रा : उच्च न्यायालयाचा दाखल देवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न 

रत्नागिरी : थिबा कालीन बौद्धविहार परिसरात उभाण्यात येणाऱ्या कम्युनिटी सेंटरवर बौद्धविहार उभारले जात असल्याचा खोटा प्रचार करण्यात येत आहे. शासनाच्या कागदावर कम्युनिटी सेंटर अशीच नोंद आहे. त्यामुळे कम्युनिटी सेंटरचे नाव पुढे करून बौद्धविहार उभारण्याला बौद्धसमाजाचा विरोध आहे. तसेच उच्च न्यायालयाचा दाखल देत काहीजण समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र समाजाची भूमिका स्पष्ट बौद्धविहाराच उभे राहिले पाहिजे त्यासाठी शासनाने सबंधित जागा समाजाच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी थिबा राजा कालिन बौद्धविहार बचाव संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष अनंत सावंत यांनी केली आहे.

शासकीय विश्रामगृह माळनाका येथे आयोजित पत्रकार परिषदेत सावंत बोलत होते. अनंत सावंत यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाने कम्युनिटी सेंटर विरोधातील याचिका फेटाळली असा दावा केला जात आहे त्याचप्रमाणे बांधकाम संदर्भात असलेली स्थगिती उठविण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात जिल्हा न्यायालयाने अद्याप स्थगिती उठविलेली नाही त्यामुळे विनाकारण काहीजणांकडून गैरप्रचार करून समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

थिबा कालीन बौद्धविहाराची जागा बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावी अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. शासनाने ही जागा बौद्ध समाजाच्या ताब्यात दिल्यास याठिकाणी समाज बौद्धविहार उभे करू शकतो; मात्र असे न करता कम्युनिटी सेंटर उभे केले जात आहे. त्यामुळे समाजामध्ये तीव्र नाराजी आहे. काही दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी कम्युनिटीसेंटरच्या नावाने बौद्धविहार उभारले जाणार असल्याची घोषणा केली; मात्र समाजाला हे मान्य नसून आम्हाला केवळ बौद्धविहारच हवे आहे त्यासाठी कोणत्याही प्रकारे तडजोड केली जाणार नाही.

यावेळी समितीचे सल्लागार दिवेन कांबळे यांनी सांगितले की, कम्युनिटी सेंटरमध्ये एक सभागृह, वाचनालय व संग्राहालय असे स्वरूप ठेवण्यात आले आहे त्यामुळे ते बौद्धविहार कसे काय होवू शकते. बौद्धविहार हे  lधार्मिक स्थळ असून त्याची एक पवित्रता असल्याने आमचा कम्युनिटी सेंटरला विरोध असल्याचे सांगितले.

पत्रकार परिषदेला थिबाराजा कालीन बौद्धविहार बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष एल. व्हि. पवार, शिवराम कदम, बी. के. कांबळे, चंद्रकांत जाधव, अजित जाधव, प्रदीप पवार, रूपेश कांबळे, दीपक जाधव, धीरज पवार, रत्नदीप कांबळे, केतन पवार, राजन जाधव, संजय आयरे, दीपक पवार आदी उपस्थित होत़े

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!