गोगटे-जोगळेकर महविद्यालयात (स्वायत्त) कै. नारायण रघुनाथ गोगटे स्मृतिदिन संपन्न

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर महविद्यालयाचे (स्वायत्त) देणगीदार कै. नारायण रथुनाथ गोगटे यांचा स्मृतिदिन ८ जुलै रोजी संपन्न झाला. कै. बाबुराव जोशी आणि कै. मालतीबाई जोशी यांनी रत्नागिरीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची सोय करण्यासाठी १९४५ मध्ये शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचे धाडसी पाऊल उचलले. त्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले. कै. नारायण रथुनाथ तथा नानासाहेब गोगटे यांच्या उदार आणि सढळ आर्थिक मदतीमुळेच हे कार्य त्यांना शक्य झाले. नानासाहेबांची ही देणगी संस्थेच्या सुरुवातीच्या काळात फार मोलाची ठरली. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी प्रतिवर्षी महाविद्यालयात कै. नारायण रघुनाथ गोगटे यांच्या स्मृतिदिनाचे आयोजन करण्यात येते.
कै. नारायण गोगटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी कै. नानासाहेब गोगटे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी महाविद्यालयाच्या सुरुवातीच्या प्रतिकूल काळापासून ते महाविद्यालय नावारूपाला येऊन स्वायत्त दर्जा प्राप्त झालेल्या काळापर्यंतच्या आठवणींना उजाळा दिला. कै. नानासाहेब गोगटे यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ र. प. गोगटे कला आणि विज्ञान महाविद्यालय या नावाने महाविद्यालय सुरू करण्यासाठी देणगी दिली. १९४५ मध्ये सुरू झालेले हे महाविद्यालय आज उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून नावारूपाला आलेले आहे. इथे कार्यरत शिक्षकांनी कै. नानासाहेब गोगटे यांच्या कार्याची जाणीव ठेऊन नि:स्वार्थपणे कार्य करून महाविद्यालयामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य, योग्य-अयोग्याची जाणीव, दानाचे महत्त्व विशद करावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी आदी मान्यवरांसह विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन समारंभ समितीच्या डॉ. मेघना म्हादये यांनी केले.



