राजिवडा (रत्नागिरी) येथून ९० हजारांचे ब्राऊन हेरॉईन जप्त
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई : दोघांना अटक

रत्नागिरी : रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शहरात मोठी कारवाई केली असून ९० हजार ५०० रुपये किंमतीचे ११ ब्राऊन हेरॉईन आणि इतर संबधित साहित्य जप्त करण्यात आले असून याप्रकरणी दोघांना राजिवडा येथून अटक करण्यात आली आहे. मुस्तकीम युसुफ मुल्ला आणि मोहसीन नूरमोहम्मद फणसोपकर (दोघेही रा. राजीवडा) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखालील पथक २४ जुलै रोजी रत्नागिरी शहरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना राजीवडा ते कर्ला रोडवरील बुडये मोहल्ला परिसरात दोन संशयित व्यक्ती हातात पिशवी घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ मुस्तकीम युसुफ मुल्ला आणि मोहसीन नूरमोहम्मद फणसोपकर (दोघेही रा. राजीवडा) या दोघांना ताब्यात घेतले.
पंचांसमक्ष त्यांच्याकडील पिशवीची तपासणी केली असता, त्यात ‘ब्राऊन हेरॉईन’ या अमली पदार्थाच्या १७५ पुड्या विक्रीसाठी आणल्याचे उघड झाले. पोलिसांनी तात्काळ हेरॉईन आणि इतर मुद्देमाल जप्त केला. या दोघांवर रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलिस अधिक तपास करीत आहेत.
पोलिस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलिस अधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कामगिरी करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक संदीप ओगले, सहायक पोलिस फौजदार सुभाष भागणे, पोलिस हवालदार शांताराम झोरे, नितीन डोमणे, बाळू पालकर, वैष्णवी यादव, भैरवनाथ सवाईराम, सत्यजीत दरेकर, योगेश नार्वेकर, विनायक राजवैद्य आणि चालक अतुल कांबळे यांनी ही कामगिरी यशस्वी केली.



