कै. प्र. ल. मयेकर कथा लेखन स्पर्धा २०२५ बक्षीस वितरण सोहळा

रत्नागिरी : शहरातील हॉटेल विवेक येथे महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे- शाखा रत्नागिरी आणि उदय सामंत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. प्र. ल. मयेकर कथा लेखन स्पर्धा २०२५ चा बक्षीस वितरण सोहळा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी बोलताना पालकमंत्री सामंत म्हणाले, “आजच्या सोशल मीडियाच्या युगात प्रत्येकजण लेखक झालेला आहे; पण हाताने लिहिण्याची आणि विचार मांडण्याची ताकद वेगळीच असते. ही स्पर्धा त्या परंपरेला पुढे नेणारी ठरली.
कोकण आणि विशेषतः रत्नागिरीला साहित्य, नाट्य, कला यांचा समृद्ध वारसा लाभला आहे. भविष्यातील पिढीने ही परंपरा जपत नवे लेखक घडवावेत, हेच या स्पर्धेचं सार्थक. या उपक्रमामुळे रत्नागिरीचं नाव “चांगल्या लेखनाचं केंद्र” म्हणून ओळखलं जाईल, असा मला विश्वास आहे. आयोजक, परीक्षक, सहभागी आणि विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.”
या स्पर्धेला लेखकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी चंद्रकांत देशपांडे, प्रकाश देशपांडे, समीर इंदुलकर, राजीव लिमये, शिल्पा सुर्वे आदी मान्यवर तसेच स्पर्धक उपस्थित होते.



