कोकणमहाराष्ट्रमुख्य बातमी

तळा कॉलेज व हायस्कूलमध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

विविध कार्यक्रम व उपक्रमांचे केले होते आयोजन

तळा (जि. रायगड) : येथील गो. म. वेदक विद्यामंदिर, कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आणि प्राथमिक विद्यामंदिर आणि द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त १३, १४ व १५ ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन केले होते.

दिनांक १३ ऑगस्ट रोजी संस्थेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तद्नंतर ऑपरेशन सिंदूर, सेव्ह गर्ल, स्वातंत्र्य दिवस, भारतीय जवान आदी विषयावर पोस्टर व राखी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १४ ऑगस्ट रोजी शाळा समितीचे चेअरमन महेंद्र कजबजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तद्नंतर देशभक्तीपर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रिया गंभीर व समूह प्रथम, इफ्फा कुरूक्कर व समूह द्वितीय, तर समिक्षा सावंत आणि समूह यांनी तृतीय क्रमांक पटकावला. यासह उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना तळा नगरपंचायतीच्या वतीने गौरविण्यात आले. तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या सुवर्णमहोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यानिमित सामूहिक पसायदानाचा जागर व तळा शहरात पालखीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान विद्यार्थ्यांनी अभंग व फुगडीचा आनंद घेतला. विनोद कोलवणकर व प्रा. पाटील यांनी फलकावर विकसित भारताकडे वाटचाल या आशयाचा संदेश देणारे चित्र काढून सर्वांचे लक्ष वेधले.

१५ ऑगस्ट रोजी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत रोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. फडकणाऱ्या तिरंग्याला सलामी देत, संपूर्ण प्रांगणात राष्ट्रगीत, ध्वजगीत व राज्यगीताचा जयघोष घुमला. तो क्षण प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हृदयात अभिमानाची लहर निर्माण करणारा होता. ध्वजारोहण पार पडल्यानंतर देशभक्तीपर गाण्यावर विद्यार्थ्यांनी सुंदर अशा कवायती सादर केल्या.

याप्रसंगी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त मारुती शिर्के, अध्यक्ष चंद्रकांत रोडे, उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे, सचिव मंगेश देशमुख, शाळा समितीचे चेअरमन महेंद्र कजबजे, किरण देशमुख, डॉ. सतीश वडके, सदस्य महादेव बैकर, लिलाधर खातू, चंद्रकांत खातू, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नानासाहेब यादव, मुख्याध्यापक दिलीप ढाकणे, सचिन भाटे, तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!