गणेशोत्सव, ईदच्या पार्श्वभूमीवर जयगड सागरी पोलीस ठाणे हद्दीतील ग्रामस्थांची बैठक

रत्नागिरी : तालुक्यातील जयगड सागरी पोलीस ठाणे हद्दीतील ग्रामस्थांची २३ ऑगस्ट रोजी गणेशोत्सव, ईद ए मिलाद सणाच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. यावेळी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, ग्रामस्थ तसेच मौलाना, पोलीस पाटील उपस्थित होते. या बैठकीत सर्वांनी सतर्क राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

तसेच पुढील मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांचे मनाई आदेश जारी असल्याने कार्यक्रमाची रितसर परवानगी घेणे. आपले गणेशोत्सव मंडळातर्फे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर मंडप उभारले जाते त्याची ग्रामपंचायत किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडून परवानगी घेऊन मंडप उभारण्यात यावा तसेच मंडळाची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात यावी. मंडळाचे वतीने कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह देखावे फलक बॅनर्स लावले जाऊ नयेत. गणेशोत्सव कालावधीत लावण्यात येणारे ध्वनी क्षेपकाची ऑनलाइन आपले सरकार पोर्टल वरती परवानगी घ्यावी. विद्युत रोषणाईबाबत योग्य खबरदारी घ्यावी तसेच कोणीही कार्यक्रमादरम्याने लेझर लाईटचा वापर करू नये. इतर धार्मिक स्थळावरून आगमन व विसर्जन मिरवणूक जाताना गुलाल उधळणार नाहीत याची योग्य ती खबरदारी घ्यावी. मूर्ती आगमन व विसर्जन वेळी रासायनिक रंगांचा वापर करू नये मिरवणुकीतील स्वयंसेवक हे मद्यपान करून मिरवणुकीत सामील होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. आगामी ईद ए मिलाद व गणेशोत्सव सण शांततेत पार पाडण्याकरिता गावचे प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून आपण आपले गावात सतर्क राहणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. गणेश मूर्ती विसर्जन ठिकाणी ग्रामपंचायतकडून विसर्जन तलाव, रस्ते साफसफाई, रस्सी, जॅकेट, पोहणारे व्यक्ती व पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करण्याबाबत सूचित करण्यात आले.
गणेशोत्सव व ईद ए मिलाद सण एकत्रित आल्याने मुस्लिम समाजाने ईद ए मिलाद अनुषंगाने काढण्यात येणारी मिरवणूक ही अनंत चतुर्दशीच्या ५ सप्टेंबर रोजी घेण्याचे घोषित बैठकीमध्ये केले आहे.



