मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

कुंभारखणी येथे कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या घुसला बाथरूममध्ये

वनविभागाकडून कुत्रा आणि बिबट्या यांची सुटका 

संगमेश्वर : तालुक्यातील मौजे कुंभारखणी खुर्द गावनवाडी येथे कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या ऋषिकेश रामचंद्र भालेकर यांच्या घराच्या बाथरूममध्ये अडकल्याची घटना आज (२५ ऑगस्ट) पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या बिबट्याला तंदुरुस्त असल्याची खातरजमा पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

याबाबत वन विभागाकडून देण्यात आलेले सविस्तर माहिती अशी : मौजे कुंभारखणी खुर्द गावनवाडी येथे कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या ऋषिकेश रामचंद्र भालेकर यांच्या राहत्या घराच्या मागील बाजूस असलेल्या बाथरूममध्ये कुत्र्याचा पाठलाग करत असताना बिबट्या अडकल्याची माहिती पोलीस पाटील कुंभारखणी खुर्द यांनी वन विभागास दिली. मिळालेली माहिती वरिष्ठांना देऊन सर्व स्टाफ आणि साहित्यासह जागेवर जाऊन खात्री करता बाथरूममध्ये कुत्रा व बिबट्या अडकला असल्याचे आढळून आले. या वेळी वन विभागाने बाथरूमचा दरवाजा वरील बाजूस लाकडी फळयानी बंद करून पिंजरा लावला व बिबट्यास सुरक्षितरित्या पिंजऱ्यामध्ये घेतले. त्यानंतर कुत्रा पण सुरक्षित बाथरुममधून बाहेर आला.

या बिबट्याची कडवईचे पशुधन विकास अधिकारी (श्रेणी १) सूर्यकांत बेलुरे यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून घेतली. हा बिबट नर जातीचा असून वय आठ ते नऊ वर्ष आहे. हा बिबट्या तंदुरुस्त असल्याची खात्री केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. यावेळी घटनास्थळी परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार, परिमंडळ वन अधिकारी संगमेश्वर देवरुख, न्हानू गावडे (वनरक्षक फुणगूस), आकाश कडूकर (वनरक्षक साखरपा), सहयोग कराडे (वनरक्षक दाभोळे), श्रीमती सुप्रिया काळे (वनरक्षक आरवली), सुरज तेली (वनरक्षक जाकादेवी), श्रीमती शर्वरी कदम (पोलीस पाटील, कुंभारखणी खुर्द), रवींद्र महाडिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

ही कार्यवाही विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरीजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी चिपळूण श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421 741335 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाचे वतीने विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!