तळा पोलीस ठाण्यात गणपती बाप्पा विराजमान
महिला बालकल्याण मंत्री ना. अदिती तटकरे यांनी घेतले दर्शन

तळा (जि. रायगड) : येथील पोलीस ठाण्यात २७ ऑगस्ट रोजी सकाळी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना पोलीस शिपाई प्रशांत दहीफळे यांच्या हस्ते विधीवत करण्यात आली. त्यानंतर महिला व बाल विकास मंत्री अदिती वरदा सुनील तटकरे यांनी तळा पोलीस ठाण्याच्या श्रीगणेशाचे दर्शन घेतले.
गणरायाच्या आगमनाची तयारी पोलीस निरीक्षक सतीश गवई यांनी तयारी केली आहे. पोलीस अधिकारी, अमंलदार, पोलीस कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहाने गणपती बाप्पाचे स्वागत केले. तळा पोलीस ठाण्यात अकरा दिवस गणपती विराजमान होणार आहे.
पोलीस चौवीस तास कामामध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांना सुट्टी मिळत नाही आणि गौरी गणपती सणाला प्रत्येकाला गावाला पोहोचणे शक्य होत नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून तळा पोलीस ठाण्यात गणपती विराजमान होत आहे.
पोलीस ठाण्यात विराजमान झालेल्या या गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या मान्यवर, प्रतिष्ठित व्यक्तींचा यथोचित सन्मान केला जातो. दररोज पूजा सेवा, सकाळ- संध्याकाळी होणाऱ्या आरतीचा मान प्रतिष्ठित व्यक्ती, जेष्ठ मान्यवर, पत्रकार, सर्व पक्षीय पदाधिकारी यांना दिला जातो.
दरम्यान काल (२७ ऑगस्ट) महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, रवीभाऊ मुंढे नगरसेवक रितेश मुंढे यांनी दर्शन घेतले. यावेळी नगराध्यक्षा माधुरी घोलप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, तालुका अध्यक्ष नाना भौड, ॲड.उत्तम जाधव उपस्थित होते. नागरिकांनी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी यावे, असे आवाहन तळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गवई यांनी केले आहे.



