प्रचारासाठी वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक, झेंडे लावण्यासाठी निर्बंध

रत्नागिरी : राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम ४ नोव्हेंबर रोजी घोषित केला आहे. या दिवसापासून आचारसंहिता लागू असून, निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक लावणे, झेंडे लावण्यासाठी जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी निर्बंध घातले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाकडील आदेशान्वये दिलेल्या निर्देशास अनुसरुन तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या शक्तीचा वापर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (आचारंसहिता कालावधीत) या आदेशान्वये श्री. जिंदल यांनी पुढील निर्बंध घातले आहेत. फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजुला विंड स्क्रिन ग्लासच्यापुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टपापासून २ फूट उंची पेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा, इतर कोणत्याही बाजूस तो लावता येणार नाही. फिरत्या वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही.



