मुख्य बातमी

रत्नागिरीत मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी; हवामान विभागाकडून जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या कडक उन्हामुळे आणि असह्य उकाड्याने हैराण झालेल्या रत्नागिरीकरांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे संपूर्ण वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उष्णतेपासून सुटका मिळाली आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, रत्नागिरी आणि आसपासच्या परिसरात अचानक ढग दाटून आले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही भागात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस कोसळला. अचानक आलेल्या या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीचा वेग काही काळ मंदावला होता, तर बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली.

भारतीय हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. पुढील २४ ते ४८ तासांत जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची आणि गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, यंदा मुख्य मान्सून २६ मे पर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे. केरळमध्ये मान्सून वेळेत आल्यास, पुढील काही दिवसांतच तो गोव्यामार्गे महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणात वेळेवर धडकण्याची शक्यता आहे. या मान्सूनपूर्व सरींमुळे कोकणातील बळीराजा देखील सुखावला असून, शेतीच्या पूर्वतयारीच्या कामांना आता वेग येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!