सलग चौदाव्या वर्षी कोकण बोर्डाची बाजी
कोकण बोर्डातील ९ विद्यार्थी १०० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण : कॉपीमुक्त परीक्षा अभियान यशस्वी

रत्नागिरी : सलग चौदाव्या वर्षी दहावीच्या निकालात कोकण बोर्डाने बाजी मारली असून कोकण बोर्डाचा निकाल ९८.२२ टक्के लागला आहे. कोकण बोर्ड पहिल्या स्थानी तर कोल्हापूर बोर्ड दुसर्या स्थानी राहिले आहे. ९ विद्यार्थी कोकण बोर्डात १०० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच बारावीचा निकाल जाहीर झाला. बारावीपाठोपाठ दहावीच्या निकालातदेखील कोकण बोर्डाने अव्वल स्थान मिळविले आहे. १४ वर्षांची परंपरा कोकण बोर्डाने अबाधित ठेवली आहे. यावेळी ९८.२२ टक्के निकाल कोकण बोर्डाचा लागला आहे. या निकालानंतर कोकण बोर्डाचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक वर्ग आणि पालक यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दहावीच्या परीक्षेसाठी कोकण बोर्डाने ११४ परीक्षा केंद्रे निश्चित केली होती. रत्नागिरी जिल्ह्यात ४१९ माध्यमिक शाळांसाठी ७३ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३० माध्यमिक शाळांसाठी ४१ परीक्षा केंद्रे निश्चित झाली होती.
मार्च २०२५ मध्ये दहावीच्या परीक्षेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून १८ हजार ११ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ८८५० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातून १७ हजार ७५६ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ८७९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सिंधुदुर्गचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.३२ तर रत्नागिरी जिल्ह्याचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.५८ टक्के इतके आहे.
यावर्षी कोकण बोर्डातून १३८७१ मुले तर १२९९० मुली परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी १३६६६ मुले व १२८८० मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.५२ टक्के असून मुलींची उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.१५ टक्के इतके आहे. तुलनात्मक विचार केला असता मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा ०.६३ टक्के अधिक आहे.
कॉपीमुक्त परीक्षा
बारावीसह दहावीच्या परीक्षेसाठी कोकण बोर्डाच्या वतीने कॉपीमुक्त अभियान परीक्षेपूर्वी राबविले होते. प्रत्येक शाळेत या कॉपीमुक्त अभियानाची जनजागृती करण्यात आली होती. यावेळी झालेल्या परीक्षेत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही कॉपीचे प्रकरण घडलेले नाही. याबाबत विभागीय बोर्डाच्या अध्यक्षांनी समाधान व्यक्त केले.



