अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीवर्षानिमित्त निबंध स्पर्धा व गुणवंत विद्यार्थी सत्कार
रत्नागिरी शहर भाजपतर्फे आयोजन

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर मंडल शहराध्यक्ष परशुराम (दादा) ढेकणे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये चांगला प्रतिसाद मिळून ५० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.

या स्पर्धेचा बक्षीस समारंभ व शहरातील शाळांमधील दहावी आणि बारावी परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत व कोकण पदवीधर विधान परिषद आमदार निरंजन डावखरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे, पदवीधर आघाडी संयोजक मनोज पाटणकर, भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा संयोजक नीलेश आखाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.

निबंध स्पर्धेसाठी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आणि कार्यावर आधारित विषय देण्यात आले होते. अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यावर लिहिण्यात आलेले निबंध अतिशय सुंदर अभ्यास व वाचन करून लिहिण्यात आले होते. यामध्ये राजसा राजेंद्र कदम, तीर्थ दीपक मयेकर, सौ. वैशाली भास्कर झोरे यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक सन्मान चिन्ह, रोख रक्कम, व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

तसेच यावेळी दहावी, बारावीतील परीक्षांमध्ये रत्नागिरी शहरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. शेकडो विद्यार्थी व पालक या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व निवेदन भ.वी.आ. जिल्हा संयोजक नीलेश आखाडे यांनी केले. या कार्यक्रमास शिर्के प्रशालेचे शिक्षक राजेश आयरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल माहिती आणि पुढील शैक्षणिक वाटचाल विषयी मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी बोलताना या उपक्रमांचे कौतुक करत अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श आपण नक्कीच घेतला पाहिजे असे सांगितले. पदवीधर आमदार निरंजन डावखरे यांनी अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले राजकीय धार्मिक सामाजिक कामाचा दाखला देत आजपर्यंत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती इतक्या मोठ्या प्रमाणात कोणी का साजरी केली नाही. त्यांचे काम देशभर जाणे आवश्यक आहे, त्यासाठीच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशभर हे कार्यक्रम केले जात आहे असे सांगितले.

या कार्यक्रमाला महिला शहराध्यक्ष सौ. पल्लवी पाटील, सौ. संगीता कवितके, सौ. सायली बेर्डे, संदीप (बाबू) सुर्वे, नितीन जाधव, सचिन गांधी, मंदार खंडकर, शैलेश बेर्डे आदी उपस्थित होते.



