मुख्य बातमी

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये नवीन अभ्यासक्रमानुसार जिल्हास्तरीय प्रशिक्षण

रत्नागिरी : मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव (रत्नागिरी) येथे जिल्हास्तरीय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ३०  जून रोजी सदर प्रशिक्षणाचे उद्घाटन दिपप्रज्वलनाद्वारे डॉ. केतन चौधरी, प्राचार्य, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी सौ. दीपा सावंत, वरिष्ठ अधिव्याख्याता, सौ. सीमा इंगळे, अधिव्याख्याता, श्रीम. देवयानी पवार, विषयतज्ञ आणि  श्रीम. श्वेता कवितके, विषयतज्ञ हे मान्यवर उपस्थित होते. आपल्या उद्घाटनपर भाषणात डॉ. चौधरी यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणातील ज्ञान, कौशल्य आणि अनुभव आधारित शिक्षण पद्धतीच्या बदलाबद्दल माहिती दिली.  विकसित भारताची वाट नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून जात असल्याकारणामुळे या प्रशिक्षण कार्यक्रम चे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे .

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), रत्नागिरी यांच्या वतीने इयत्ता ३ री आणि ४ थीच्या शिक्षकांसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. प्रशिक्षणार्थिना सुनीता राणे, समृद्धी गोनबरे, चित्रा ठाकूर, शैलेश निकम, शिवप्रसाद गडमवार, विजय आखाडे आणि समीर काबदुले यांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणात सुमारे ११२ शिक्षकवर्गीय अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.

प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथील परिषद दालन, वर्गखोल्या, प्रशिक्षणार्थीची निवास व्यवस्था तसेच इतर आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. काही प्रशिक्षणार्थींची निवास व्यवस्था मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरी येथे करण्यात आली होती. प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने, त्यांना आधुनिक शैक्षणिक वातावरणात प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली.

या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाची सखोल माहिती मिळून अध्यापन अधिक परिणामकारक होण्यास मदत होणार आहे. जिल्हास्तरीय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रातील विविध संस्थांमधील समन्वय अधिक दृढ होणार असून, गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!