निवळी कोष्टेवाडी येथे हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

आबलोली (संदेश कदम) : श्री हनुमान सेवा मंडळ निवळी कोष्टे वाडी यांच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी निवळी कोष्टे वाडी (ता. चिपळूण) येथील श्री हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन ३० मार्च ते २ एप्रिल या कालावधीत आयोजन केले आहे.
३० मार्च रोजी लहान मुलांचे फनी गेम्स खेळण्यात येणार असून १ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली असून, सायंकाळी ७ वाजता स्थानिक मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री १० वाजता लेखक, दिग्दर्शक संतोष पवार लिखित “हीच खरी फॅमिलीची गंमत आहे” या नाटकाचा नाट्य प्रयोग सादर होणार आहे. या नाटकाचे लेखन आणि गीते संतोष पवार यांनी लिहिले असून या नाटकाला नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे लाभले आहे. संगीत अशितोष वाघमारे यांचे असून प्रकाशयोजना निखिल सातोपे आणि वेशभूषा हास्या पवार यांनी केली आहे. या नाट्य प्रयोगात हर्षदा कर्वे, प्रतीक पाध्ये, मनीषा कुळकर्णी, राकेश शालिनी आणि शलाका पवार, रमेश वाणी, संतोष पवार हे कलाकार सहभागी होणार आहेत.
२ एप्रिल रोजी पहाटे ६.३४ वाजता श्री हनुमान जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार असून त्यानंतर सकाळी ८.३० वाजता ढोल-ताशे, टाळ-मृदुंग, चिपळी अशा पारंपरिक वाद्याच्या गजरात दिंडी आणि हनुमंताची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी १२.३० वाजता सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले असून सायंकाळी ७ वाजता हरिपाठ व श्री हनुमान सेवा मंडळ निवळी कोष्टी वाडी प्रसादीक भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होईल.
या सोहळ्याला निवळी पंचक्रोशीतील जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन श्री हनुमान मंदिर, निवळी कोष्टेवाडी या मंडळातर्फे करण्यात आले आहे.


