मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

जयगड येथे एलईडी नौकेवर कारवाई

३ तांडेल ताब्यात : सुमारे ३ ते ४ लाखांची सामग्री जप्त

रत्नागिरी : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या स्पष्ट निर्देशानंतर मत्स्य व्यवसाय खाते अधिक आक्रमक झाले असून अनधिकृत मासेमारीवर कारवाई केली जात आहे. शुक्रवारी (७ मार्च) रात्री जयगड येथे एलईडी नौकेवर कारवाई करण्यात आली आहे. यामधे ३ तांडेलांसह अंदाजे ३ ते ४ लाख रुपयांची लाईट, जनरेटर व इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे.

दि. ७ मार्च रोजी रात्री सुमारास जयगडसमोर मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, जयगड) श्रीमती स्मितल कांबळे व सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, गुहागर) स्वप्नील चव्हाण हे नियमित गस्त घालत होते. यावेळी राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली मोहम्मद हनिफ हसनमिया तांडेल, (रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) यांची नौका अल-हज-हसन- (नों. क्र. IND-MH-4-MM-5701) द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात जयगडसमोर अनधिकृतरित्या एलईडी लाईटद्वारे मासेमारी करत असताना पकडले. या नौकेवर नौका तांडेलसह ३ खलाशी होते.

ही नौका जप्त करून जयगड बंदरात ठेवण्यात आली आहे आणि त्यावर मासळीचा आढळून आलेली नाही. नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे जप्त करून ठेवण्यात आली आहेत. अंदाजे ३ ते ४ लाख रुपयांची लाईट, जनरेटर व इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे.

अंमलबजावणी अधिकारी श्रीमती स्मितल कांबळे, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, जयगड) व स्वप्नील चव्हाण, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, गुहागर), सागरी सुरक्षा पर्यवेक्षक जयगड सुजन पवार, सागरी सुरक्षा पर्यवेक्षक गुहागर विनायक शिंदे आणि सागरी सुरक्षा रक्षक यांचे सहकार्याने ही कारवाई केली आहे.

अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर या नौकेबाबत सुनावणी मा. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी यांच्या कोर्टात ठेवण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!