गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात प्रथमोपचाराची मूलतत्त्वे अभ्यासक्रम संपन्न

रत्नागिरी : महाविद्यालयात PM-USHA अभियान अंतर्गत प्राप्त झालेल्या अनुदानातून विद्यार्थ्यांसाठी विविध प्रमाणपत्र, कौशल्य विकसन आणि व्यावसायिक कौशल्यावर आधारित अभ्यासवर्गांचे आयोजन करण्यात आले होते. प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने १८ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट या कालावधीत प्रथमोपचाराची मूलतत्त्वे (First Aid Fundamentals) या प्रमाणपत्र अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यासवर्गाचा सांगता समारोप समारंभ नुकताच संपन्न झाला. या प्रसंगी विवेक राणे (उप अग्निशमन अधिकारी) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आपल्या मनोगतातून श्री. राणे यांनी प्रथमोपचार व आपत्ती व्यवस्थापनातील विविध संधींविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. मकरंद साखळकर होते. आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती दिली व प्रथमोपचाराचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमासाठी डॉ. यास्मिन अवटे व प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. मधुरा मुकादम या देखील उपस्थित होत्या.
या अभ्यासवर्गात विद्यार्थ्यांना प्रथमोपचाराची मूलतत्त्वे या शीर्षकाखाली, विविध उपचार पद्धती व कौशल्ये शिकविण्यात आली. जसे की, जखमावर विविध पट्टी लावणे, अग्निशामक उपकरणाचे उपयोग, जखमींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे, विमोचनासाठी विविध दोरगाठी तयार करणे इ. या अभ्यासवर्गात अनन्सिंग गढरी, अक्षय जाधव, योगेश पावसकर या आपत्ती व्यवस्थापण क्षेत्रातील अनुभवी तज्ञ प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच चार विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरुपात मनोगत व्यक्त केले. या अभ्यासवर्गाचे समन्वयक म्हणून प्रा. अंबादास रोडगे यांनी उत्कृष्टपणे नियोजन केले. अभ्यासवर्ग यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन, तर पीएम-उषा समन्वयक आणि शास्त्र शाखा उपप्राचार्या प्रा. डॉ. अपर्णा कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अतिका राजवाडकर आणि आभारप्रदर्शन प्रा. मोहिनी बामणे यांनी केले.



