लांजा येथे बागेत आढळला मृत बिबट्या

लांजा : येथील एका कुक्कुटपालन संस्थेच्या आंबा, नारळ आणि काजूच्या बागेत एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे झालेल्या अपघातात या बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तवला आहे.
या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी, लांजा येथील कुक्कुटपालन संस्थेचे संचालक प्रवीण जेधे यांना शनिवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास बागेत बिबट्या मृतावस्थेत पडलेला दिसला. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती वनविभागाला दिली. माहिती मिळताच लांजा येथील वनपाल आणि वनरक्षकांनी घटनास्थळी पाहणी केली. हा बिबट्या साधारण दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत झाला असावा, अशी शक्यता घटनास्थळावरील परिस्थितीवरून व्यक्त करण्यात आली.
लांजा येथील सहाय्यक आयुक्त (पशुवैद्यकीय अधिकारी) यांनी मृत बिबट्याची तपासणी केली असता, त्याच्या डोक्याला आणि कंबरेला गंभीर जखमा झाल्याचे दिसून आले. एखाद्या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमुळेच या जखमा होऊन बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मृत बिबट्या हा मादी जातीचा असून त्याचे वय अंदाजे सहा महिने आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले असून वनविभागाने या घटनेची नोंद केली आहे.
ही कारवाई रत्नागिरीच्या विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड आणि परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये वनपाल धुळू कोळेकर, वनरक्षक नमिता कांबळे आणि रेस्क्यू टीमचे सदस्य अमित लांजेकर यांनी सहभाग घेतला. याप्रकरणी वनविभागाने पुढील तपास सुरू केला असून, नागरिकांनी वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास किंवा अशा घटना घडल्यास वनविभागाच्या १९२६ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई यांनी केले आहे.



