रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळ संचलित येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. १४ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता कॅप्टन ठाकूर सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जानकी घाटविलकर होत्या. प्रमुख वक्ते म्हणून माजी मुख्याध्यापक मिलिंद कदम उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय सहा. शिक्षिका श्रीमती सुनीता अहिरे यांनी करून दिला. त्यानंतर प्रमुख वक्ते श्री. कदम यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर, सामाजिक क्रांतीवरील त्यांचा प्रभाव, स्त्रियांच्या हक्कांसाठी लढा आणि मानवाधिकारासाठी त्यांनी केलेले कार्य यावर सखोल विचार मांडले.


विद्यार्थ्यांनीही आपल्या मनोगतातून बाबासाहेबांविषयी आदर व्यक्त केला. कांचन केशव आंबेकर आणि केतकी लक्ष्मीकांत केतकर (इ. ११ वी वाणिज्य) या विद्यार्थिनींनी “आज मी इथे उभी आहे ते बाबासाहेबांमुळे” असे मनोगत व्यक्त करत उपस्थितांचे मन जिंकले. यानंतर श्रद्धा सनगरे हिनेही आपले विचार प्रभावीपणे मांडले.

शिक्षकांपैकी मनोज फडवळे आणि संदीप कांबळे सर यांनी डॉ. आंबेडकर यांचे परराष्ट्र धोरण व राष्ट्रवाद विषयक विचार विषद केले. “पुस्तकाशिवाय मुलांचे मस्तक घडणार नाही” या बाबासाहेबांच्या विचारावर भर देत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतातून मुख्याध्यापिका सौ. घाटविलकर यांनी बाबासाहेबांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करत सर्वांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी सहा. शिक्षिका श्रीमती सुनीता गाडगीळ यांनी सर्व मान्यवरांचे, वक्त्यांचे आणि उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन सहा. शिक्षिका सौ. श्रद्धा पिलणकर यांनी केले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाला.



