आता भैरी मंदिरासह तीन मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू
अंमलबजावणी सुरू, देवस्थान अध्यक्ष रवींद्र सुर्वे यांची माहिती

रत्नागिरी : रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिरासह झाडगाव येथील जोगेश्वरी मंदिर आणि तांबटआळी येथील नवलाई, पावनाही देवीच्या मंदिरात भाविकांना आता पारंपारिक पोषाखातच प्रवेश देण्याचा निर्णय ट्रस्टींनी घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १२ एप्रिलपासून करण्यात आली आहे. श्री देव भैरीवर बारा वाड्यातील ग्रामस्थांसह राज्यातील भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिरात नित्यनेमाने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांबरोबरच दूरदूरचे भाविकेही दर्शनाला येतात, मंदिरात पवित्र्य राखले जावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.
भैरी मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिक नागरिकांना आपल्या वेशभूषेची माहिती असल्याने ते पारंपरिक वेशभूषेत दर्शनासाठी येतात. मात्र परजिल्ह्यासह परराज्यातून येणाऱ्या भाविकांना याची माहिती नसल्याने नेहमीच्या राहणीमानातील कपडे घालून मंदिरात प्रवेश करतात. ही गोष्ट श्री देव भैरी देवस्थान ट्रस्टींच्या लक्षात आल्यामुळे मंदिर व्यवस्थापनाने मंदिरात प्रवेश करण्यासाठी ‘ड्रेस कोड’ लागू केल्याचे देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र उर्फ मुन्ना सुर्वे यांनी सांगितले.



