मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

धोकादायक जानवळे ग्रामपंचायत इमारतीची गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर यांच्याकडून पाहणी

इमारतीमध्ये कामकाज न करण्याच्या सूचना

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील जानवळे ग्रामपंचायत इमारत गेले अनेक दिवस होत असलेल्या अतिवृष्टीमुळे जास्तच धोकादायक झाली असून या इमारतीची गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर यांनी पाहणी करून धोकादायक झालेल्या इमारतीचा अहवाल तात्काळ जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवण्यात येईल असे स्पष्ट केले.

या इमारतीसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी स्वातंत्र्यदिनी पंचायत समिती गुहागर कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला होता. हे उपोषण यावेळी स्थगित करावे, अशी विनंती प्रशासनाकडून श्री. जानवळकर यांना करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी तूर्तास उपोषण स्थगित केले होते; परंतु गेले अनेक दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे ही इमारत जास्त धोकादायक बनली आहे. या इमारतीची तात्काळ गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर यांनी पाहणी केली. या इमारतीमध्ये कामकाज करू नये अशा सूचना गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या आहेत.

यावेळी बोलताना मनसे जिल्हा उपाध्यक्ष श्री. जानवळकर म्हणाले की, जानवळे गावातील ग्रामपंचायतीच्या इमारतीची दयनीय अवस्था झाली असून इमारत पूर्णपणे नादुरुस्त आहे. या इमारतीत बसणारे व काम करणारे कर्मचारी व पदाधिकारी जीव मुठीत घेऊन बसतात. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामपंचायत इमारत अधिकच धोकादायक बनली आहे; परंतु ग्रामपंचायत इमारतीसाठी अद्यापही निधी दिलेला नाही. एकीकडे ग्रामपंचायतीकडून कुठलाही प्रस्ताव व मागणी नसताना जानवळे ओझरवाडी येथे तीस लाख रुपये खर्च करून साकव बांधण्यात आला, यासाठी जिल्हा नियोजनमधून ३० लाख रुपयांचा निधी देण्यात आला; परंतु गावाच्या विकासासाठी असलेल्या ग्रामपंचायत इमारतीसाठी गेली अनेक वर्षे शासनाकडे निधीची मागणी करून देखील लागणारा निधी मिळत नसल्याची खंत आहे. शासन एकीकडे विनाकारण विना मागणी कामासाठी लाखो रुपये निधी खर्च करत असून आणि जे गरजेचे आहे यासाठी निधी उपलब्ध केला जात नाही हे योग्य नाही. ही इमारत कोसळून गंभीर अपघात झाल्यास याला जबाबदार शासन असेल का, असाही सवाल श्री. जानवळकर यांनी उपस्थित केला आहे.

गेली अनेक वर्षे पंचायत समिती गुहागर व जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याकडे मागणी करूनही या नवीन इमारतीसाठी निधी देण्यात आला नाही. जानवळे ग्रामपंचायत इमारतीबाबत “मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना” अंतर्गत इमारत बांधण्याचा प्रस्ताव आहे; परंतु त्यावरही अद्याप कार्यवाही झाली नाही. या इमारतीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तात्काळ निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी विनोद जानवळकर व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!