मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

श्री क्षेत्र टेरव येथे १४ मार्चपासून साजरा होणार शिमगोत्सव

चिपळूण : श्री क्षेत्र टेरवच्या कुलस्वामिनी श्री भवानी – वाघजाई या सुप्रसिद्ध व जागृत देवस्थानचा शिमगोत्सव मोठ्या जल्लोषात व धार्मिक वातावरणात १४ मार्चपासून साजरा होणार आहे. देवस्थानचे मानकरी, ग्रामस्थ, पुजारी हे उत्सवाची जय्यत तयारी करत आहेत.

१४ मार्च रोजी सकाळी कुलस्वामिनी श्री भवानी- वाघजाई मंदिरासमोर ग्रामस्थांनी आणलेली लाकडे, कवळ व गवत इत्यादीने सजविलेल्या होमाची पुजारी पारंपारिक पद्धतीने गावच्या मानकऱ्यांच्या हस्ते यथासांग विधीवत पुजा करुन घेतील. गावचे पुजारी (गुरव) चांदीने मढविलेली पालखी सजवून कुलदैवत श्री भवानी, ग्रामदैवत श्री वाघजाई, भैरी, केदार, महालक्ष्मी व कुलस्वामिनी या देवतांच्या रुपी लावून मंदिर व होमा समोरील मानाच्या सहाणेवर आसनस्थ करतील. सकाळी ९ वाजता ढोलताशांचा गजरात होमाभोवती पालखीच्या पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर होम प्रज्वलीत करुन ग्रामस्थ होळीत अग्निदेवतेस श्रीफळ अर्पण करतील. प्रदक्षिणा घालताना भैरी- केदाराच्या चांगभलं असे म्हणत पालखी नाचवत उंचावून उपस्थित भाविकांना दर्शन दिले जाईल, तो क्षण डोळ्याचे पारणे फेडणारा असेल. सुवासिनी सहाणेवर पालखीत देवीच्या ओट्या भरतील व नंतर पालखी मंदिरात स्थानापन्न होईल.

संध्याकाळी चार वाजता पालखी लिंगेश्वर वाडीतील स्वयंभू पुरातन जागृत शंकर मंदिर येथील मानाच्या सहाणेवर नेण्यात येईल. लिंगेश्वर वाडीतून पालखीचा छबिना काढून निम्मेगाव, गुरववाडी, कुंभारवाडी, राधाकृष्णवाडी, भारतीवाडी आणि तळेवाडी अशी वाजत-गाजत रात्रौ मंदिरात आणली जाईल. छबिन्याच्या वेळी वाडी-वाडीतील ग्रामस्थ आकर्षक विद्युत रोषणाई सह रांगोळी काढून फटाक्यांची आतिषबाजी करतील व गुलाल उधळून ढोल ताशांच्या गजरात पालखीचे जल्लोषात स्वागत करून, सुवासिनी ठिकठिकाणी ओट्या भरतील.

१५ ते २५ मार्च या कालावधीत पालखी रूढीपरंपरेनुसार घरोघरी नेण्यात येईल यास भोवनी असे संबोधले जाते. सदर शिमगोत्सवास बहुसंख्य चाकरमानी कुटुंबियांसह आवर्जुन उपस्थित राहतील. पालखी कुठेही वास्तव्यास न राहता ती मिरवणुकीने वाजत-गाजत वाडी-वाडीतील घरे झाल्यावर रात्री मंदिरात आसनस्थ होईल. रात्रौ ग्रामस्थ वाडीतील पाळ्यांप्रमाणे मंदिरात पहाऱ्यासाठी (सेवेसाठी) उपस्थित राहतील.

या कालावधीत मंदिर सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहील. पालखीसोबत अब्दागिरी व भगवे निशाण नाचवत ढोल वाजविले जातील. परंपरेनुसार गावातील मुस्लिम बांधव पालखीसोबत ताशा वाजावतील, अशा या सांस्कृतिक, सामाजिक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या शिमगोत्सवाची सांगता रूपी भंडारून करण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!