बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कार्यरत स्थानिक कर्मचाऱ्यांची संख्या कार्यालयाबाहेर प्रकाशित करावी
मनसे सरचिटणीस डॉ. मनोज चव्हाण यांची राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

रत्नागिरी : महाराष्ट्रातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कार्यरत स्थानिक कर्मचाऱ्यांची संख्या कार्यालयाबाहेर प्रकाशित करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष डॉ. मनोज चव्हाण यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या शेजारील कर्नाटक राज्याने एक नवा कायदा संमत केला आहे. त्या अनुसार राज्यात कार्यरत असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्यांच्याकडे कार्यरत असलेल्या स्थानिक भूमिपुत्र कर्मचाऱ्यांची संख्या कार्यालयाबाहेर प्रकाशित करणे सक्तीचे केले आहे. अशी यादी प्रकाशित न केल्यास, संबंधित कंपनीचा परवाना रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
याच धर्तीवर महाराष्ट्रातही असा कायदा करणे आवश्यक आहे. आपल्याकडील पालघर, तारापूर, मुंबई, पुणे, ठाणे येथे बहुराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत. मात्र तेथे कर्मचारी नियुक्त करताना स्थानिकांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी आहेत. स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी कर्नाटकच्या धर्तीवर कायदा करण्याची आवश्यकता आहे. तरी त्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी. येत्या मंत्री मंडळ बैठकीत सदरील विषय प्राधान्याने घेऊन तसा कायदा करावा.”
आपले सरकार हे जनतेचे सरकार आहे याच भावनेतून हे पत्र आपल्याला देत असून, या विषयासंबंधी माहिती घेऊन लवकरच निर्णय अंमलात आणून आम्हाला ही आपला निर्णय अवगत करावा, अशी मागणी यात केली आहे.


