Uncategorized

चिपळूणमध्ये “एनडीआरएफ” सज्ज

खेडमध्ये जगबुडी नदी इशारा पातळीच्यावर : नागरिकांना सतर्कतेचा इशारा

खेड : सततच्या मुसळधार पावसामुळे खेड शहरातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून नदीच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने शहरातील नदीकाठच्या नागरिकांसह व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची टीम १ जुलै रोजी रात्री उशिरा चिपळूणमध्ये दाखल झाली आहे. या पथकाने आज एनडीआरएफच्या पथकाने चिपळूण शहरातील पूरप्रवण आणि संवेदनशील भागांची पाहणी केली.

आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी महसूल, पोलीस, नगरपालिका तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आली आहे. बचावकार्यासाठी आवश्यक साहित्य, लाइफ जॅकेट, बचाव नौका (बोटी) आणि अन्य उपकरणांसह सर्व पथके तैनात करण्यात आली आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे तसेच आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

चिपळूण येथे दाखल झालेल्या एनडीआरएफच्या पथकात ३ अधिकारी, २३ जवान आणि ३ चालक यांचा समावेश आहे. आज या पथकाने चिपळूण शहरातील पूरप्रवण आणि संवेदनशील भागांची पाहणी केली. संभाव्य बचावकार्याची तयारी, स्थलांतराचे मार्ग, नदीकाठची परिस्थिती आणि आपत्कालीन प्रतिसादासाठी आवश्यक नियोजनाचा आढावा घेण्यात आला. प्रशासन आणि एनडीआरएफ यांच्यात समन्वय ठेवून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने बचावकार्य सुरू करण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे, नदीपात्राजवळ जाणे टाळण्याचे तसेच हवामान विभाग आणि प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!