“मेफेड्रोन” अमली पदार्थ विक्री करणारा एकजण ताब्यात
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची चिपळूणमध्ये कारवाई

रत्नागिरी : चिपळूण शहरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक गस्त घालत असताना खेर्डी एमआयडीसीकडे जाणाऱ्या मार्गावर एकजण चारचाकी वाहनामध्ये संशयित हालचाली करत असल्याचे पथकाच्या लक्षात आले. याबाबत अधिक चौकशी केली करून तपासणी केली असता त्याच्याकडे “मेफेड्रोन” हा ९ ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ आढळला. याप्रकरणी दीपक रंगलाल लीलारे (वय २४, रा. कावीळ तळी ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) याला चारचाकीसह ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांना प्रतिबंध व कारवाई करण्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी व अंमलदार चिपळूण शहरात २५ एप्रिल रोजी गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना खेर्डी एमआयडीसीकडे जाणाऱ्या मार्गावर एक इसम त्याच्या ताब्यातील स्विफ्ट या चारचाकी वाहनामध्ये संशयित हालचाली करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
या पथकामार्फत संशयित इसमाकडे दोन पंचांसमक्ष चौकशी व तपासणी केली असता त्याच्या ताब्यातील स्विफ्ट हे चारचाकी वाहन (क्रमांक एमएच०८- एजी-०३३७) या मध्ये एक पिशवी दिसली. त्यात एका पुडीत “मेफेड्रोन” हा ९ ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ आढळला. याप्रकरणी दीपक रंगलाल लीलारे याला वाहन व मुद्दे मालासह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ कायद्यान्वये चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दीपक लीलारे याच्या ताब्यातून ९ ग्राम “मेफेड्रोन” सदृश अमली पदार्थ तसेच एक स्विफ्ट हे चारचाकी वाहन (क्रमांक एमएच०८- एजी-०३३७) असा मिळून एकूण ५ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक, रत्नागिरी व अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. ढेरे व चिपळूण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास जाधव, उपनिरीक्षक हर्षद हिंगे, रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पो.हवा बाळू पालकर, पो.हवा विक्रम पाटील, पो.हवा प्रवीण खांबे, पो.हवा गणेश सावंत, पो.हवा वृषाल शेटकर, पो.शी नीलेश शेलार, तां.वि.शा, रत्नागिरी व चा.पो.शी अतुल कांबळे या पथकाने केली.



