पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ५० हजार मुलींना एचपीव्ही लस देणार : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : “आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये महिलांच्या आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय आम्ही घेतला. महिलांना कॅन्सर (कर्करोग) होऊ नये, यासाठी एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) ही लस देण्यात येणार आहे. ही लस सर्व्हायकल कॅन्सरपासून संरक्षण देणारी आहे. त्यामुळे भविष्यात लस घेतलेल्या मुलींना कॅन्सर होण्याची शक्यता फार कमी आहे. ९ ते १४ वयोगटातील मुलींना ही लस दिली जाणार आहे. जिल्ह्यात १ लाख मुलींना लस देण्याचे उद्दिष्ट आहे; परंतु पहिल्या टप्प्यात ५० हजार मुलींना ही लस दिली जाणार आहे,” अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
जिल्हा नियोजन विकास समितीची बैठक पालकमंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज (२ मे) झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला यावेळी खासदार नारायण राणे, सुनील तटकरे, मंत्री योगेश कदम, आमदार किरण उर्फ भैय्या सामंत, शेखर निकम, निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आदी अधिकारी, विविध खात्यांचे प्रमुख उपस्थित असल्याचे ना.सामंत यांनी सांगितले.
१०८ रुग्णवाहिका जिल्ह्याबाहेर किंवा तिच्या कार्यक्षेत्राबाहेर नेता येत नव्हती; परंतु आता आम्ही असा निर्णय घेतला आहे. रुग्णाच्या अत्यावश्यक सेवेसाठी त्याची परिस्थिती पाहून जिल्ह्याबाहेर नेण्याची परवानगी देण्यात येणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांना त्याबाबत अधिकार दिले जाणार असल्याचे पालकमंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले, “जिल्हा विकास योजनेचे गतवर्षी १०० टक्के निधी खर्च झाला आहे. २०२५- २६ साठीच्या ४०६ कोटींचा विकास आराखडा आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. हा निधी आर्थिक वर्षांमध्ये खर्च करण्याच्यादृष्टीने खातेप्रमुखांना सूचना दिल्या आहेत. जिल्हा विकास नियोजनची आजची सभा खेळीमेळीत झाली. जिल्ह्याच्या लोकसंख्येप्रमाणे गेल्यावर्षी ३११ कोटीची विकास आराखडा तयार करण्यात आला होता. तो १०० टक्के खर्च केला. पुढील आर्थिक वर्षासाठी ४०६ कोटींचा विकास आराखड्याला आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
शाळांमध्ये ही लस देण्यात येणार असल्याचे सांगतानाच कॅन्सरबाबत निदान व्हावे यासाठी मॅमोग्राफी टेस्ट केली जाणार आहे. आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्यादृष्टी काही निर्णय घेतले आहेत. रुग्णवाहिका वाढविणे, लोकमान्य मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे आधुनिकीकरण करणे, कोरोना महामारीच्या काळात वापरात आलेली यंत्रणा इकडे कशी वापरता येईल किंवा वळवता येईल याचा विचार सुरू आहे. अधिकच्या खाटा, डायलिसिस युनिट, ऑक्सिजन युनिट आदीच्या वापराबाबत विचार सुरू असल्याचे पालकमंत्री सामंत म्हणाले.
जिल्ह्यातील खैराची झाडे तयार करून ती प्रत्येक शेतकऱ्यांना वाढविण्यासाठी देण्याबाबत यापूर्वी निर्णय झाला होता. वन विभागाने दिलेल्या अहवालानुसार ५ लाखांपैकी ३ लाख ७० हजारांच्यावर खैराची झाडे तयार आहेत. ती आता शेतकऱ्यांना कशी वाटायची याबाबत विचार सुरू आहे. परंतु ती लवकरच वाटप करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ काढण्याचा काम सुरूच आहे. बेरोजगारी दूर व्हावी, यासाठी विविध प्रकल्प आणले जात आहेत. तसचे अन्यबाबींचाही विचार सुरू आहे. मुख्यमंत्री रोजगार योजनेचे उद्दिष्ट १२० टक्के पूर्ण झाले आहे, असे सामंत म्हणाले.
बीएसएनएल कंपनीचे अधिकारी जिल्ह्याच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहत नव्हते; परंतु त्यांना आम्ही चांगल्या भाषेत सांगितल्यामुळे ते बैठकीला येतात. बीएसएनएलच्या नेटवर्कबाबत जिल्ह्यात तक्रारी आहेत. त्यावर येत्या तीन महिन्यात अभ्यास करून त्या सोडवल्या जातील, असे आश्वासन कंपनीने दिले आहे.



