संगमेश्वर तालुका उत्तर विभाग शिक्षण प्रसार संघ अध्यक्षपदी के. डी. गमरे यांची निवड

रत्नागिरी : तालुक्यातील करजुवे – धामापूर परिसराचे सुपुत्र काशीराम धर्माजी गमरे यांची संगमेश्वर तालुका उत्तर विभाग शिक्षण प्रसार संघाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.
संगमेश्वर तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात मागासवर्गीय बौद्धांसह अन्य एससी, एसटी, ओबीसी, भटक्या विमुक्त गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा वसा घेतलेल्या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी बहुजन समाजातील जेष्ठ समाजसेवक आयु. के. डी. गमरे यांची नियुक्ती झाल्याने तालुक्यासह मुंबई उपनगरात आनंद व्यक्त केला जात आहे. बहुजन समाजातील कोणीही होतकरू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहताकामा नये यासाठी तब्बल ७५ वर्ष संगमेश्वर तालुका रत्नागिरी जिल्ह्यात विद्यार्थी वसतीगृह सुरू आहे.
या संस्थेच्या माध्यमातून आजतागायत अनेक विद्यार्थी मोठ-मोठ्या पदावर कार्यरत आहेत तर काहींनी व्यवसायात आपले नाव कमावले आहे. त्यामुळे अशा कर्तृत्ववान विद्यार्थ्यांच्या हितकारी संस्थेच्या अध्यक्षपदी आयु. के. डी. गमरे यांची निवड झाली याबद्दल माजी विद्यार्थी तसेच संगमेश्वर तालुका उत्तर विभाग शिक्षण प्रसार संघ मुंबई शाखेचे सचिव शशी गमरे व संचालक मंडळ तसेच ग्रामीण शाखा अध्यक्ष रोहीत तांबे व संचालक मंडळ, संस्थेचे कायदेविषयक सल्लागार तथा मायबाप बालसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रशांत जाधव यांसह जिल्ह्यातील बहुजन समाजातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
आयु के. डी. गमरे हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकेत सेवेत असताना तेथे त्यांनी रिझर्व्ह बँक बुद्धिस्ट एससी, एसटी कामगार संघटनेच्या माध्यमातून भव्य असे कौतुकास्पद क्रांतीकारी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्य केले आहे. तसेच त्यांनी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा तालुका संगमेश्वरचे उपाध्यक्ष म्हणून अनेक वर्ष नेतृत्व केले आहे. धार्मिक सामाजिक शैक्षणिक कामाचा प्रचंड अनुभव असलेले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील ज्येष्ठ नेते या नात्याने ते बहुजनांमध्ये परिचित आहेत त्यांच्या निवडीने तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे समाजभूषण व माजी श्रामणेर प्रकाश कमलाकर जाधव (मेढेकर) यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.



