सर्वोदय छात्रालयात रविवारी रंगणार छात्रमित्र मेळावा
सर्वोदय पुरस्कार डॉ. श्रीपाद कोदारे यांना जाहीर

रत्नागिरी : श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टच्या सर्वोदय छात्रालयातील माजी छात्रांचा छात्रमित्र मेळावा उद्या (११ मे) डॉ. बा. ना. सावंत रोड येथील सर्वोदय छात्रालयाच्या मोरोपंत जोशी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सर्वोदय पुरस्कार डॉ. श्रीपाद कोदारे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
छात्रालयाचा हा विसावा छात्रमित्र मेळावा आहे. मेळाव्याच्या सुरवातीला सकाळी ९ ते १० या वेळेत नाव नोंदणी, नाष्टा, चहा होईल. त्यानंतर १० ते २ या वेळेत छात्रमित्रांचा परिचय व छात्र थोडक्यात मनोगते व्यक्त करतील. या मेळाव्यात माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गीते व श्रीमती गीते यांनी पुरस्कृत केलेला दुसरा सर्वोदय पुरस्कार गुणवंत माजी छात्र डॉ. श्रीपाद कोदारे यांना प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. कोदारे हे सर्वोदय छात्रालयाचे माजी विद्यार्थी. कुणबी शिक्षण मंडळ (खेर्डी) संचलित न्यू इंग्लिश स्कूल कमिटीचे चेअरमन म्हणून गेली तीस वर्षे कार्यरत आहेत. किसान पतपेढीच्या कामामध्येही ते सक्रिय आहेत. सर्वोदय छात्रालयाचे संस्कार, आचार विचार यातून ते सामाजिक कार्यही करत आहेत.
कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन, मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर, मोरोपंत तथा तात्यासाहेब जोशी, शामराव तथा अण्णासाहेब पेजे इत्यादी महनीयांच्या पुण्याईचा वारसा या छात्रालयाला लाभला आहे. त्यामुळे विविध ठिकाणचे छात्र उपस्थित राहणार आहेत. शैक्षणिक जीवनातील, छात्रालयातील जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, आपले स्नेहबंध मजबूत करण्यासाठी या मेळाव्याला विविध ठिकाणचे छात्र उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याला जास्तीत जास्त माजी छात्रांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्टच्या छात्र मित्र मेळावा समिती सदस्य रघुवीर शेलार, दयानंद परवडी, किशोर ठुल, शिवप्रकाश चौगुले, ॲड. मिलिंद लोखंडे, ॲड. सचिन बेर्डे, जयदीप कांबळे, धीरज धातकर यांनी केले आहे.



