आरोग्यमुख्य बातमी

रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथमच ७५० ग्रॅम वजनाच्या बालकाला नवसंजीवनी

रत्नागिरी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जन्मलेल्या कमी दिवसाच्या आणि कमी वजनाच्या बाळाला नवसंजीवनी देण्याचे काम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने केले आहे. जन्मताक्षणी अवघे ७५० ग्रॅम वजन असलेल्या बाळावर गेले ६० दिवस विशेष मेहनत घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी यश मिळविले आहे.

रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विशेष नवजात शिशु काळजी कक्षात (SNCU ) १५ मे रोजी सकाळी ५.५० वाजता श्रीमती लीना सुतार (वय ३३ वर्ष, रा. मु.पो.पाली, ता.जि. रत्नागिरी) यांच्या मुलाला दाखल करण्यात आले. या बालकाचा जन्म हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी येथेच दिनांक १५ मार्च रोजी सकाळी ०५.३० वाजता झालेला असून बालक जन्मतः खूपच कमी वजनाचे (७५० ग्रॅम) व कमी दिवसाचे (२७ आठवडे) होते.

बाळाची परिस्थिती अत्यंत नाजूक होती; परंतु शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर यांच्या मार्गदर्शनाखाली SNCU विभागामध्ये कार्यरत बालरोग तज्ञ व महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. शायान पावसकर, महाविद्यालयाचे वरिष्ठ निवासी डॉ. आदित्य वडगावकर तसेच अधिसेविका श्रीम. जयश्री शिरधनकर, बालरोग तज्ज्ञ परिचारिका श्रीम. श्रुती जाधव व कक्ष पर्यवेक्षिका श्रीम. सुवर्णा कदम तसेच कार्यरत अधिपरिचारिका यांच्या अथक परिश्रमाने बालकामध्ये सुधारणा होत गेली.

बालकाला श्वसनाचा त्रास असल्याने व्हेंटिलेटरद्वारे कृत्रिमरित्या श्वास देण्यात आला. तसेच बालकाला RDS ( Respiratory Distress Syndrome ) वर उपचारासाठी श्वसन नलिकेद्वारे सारफॅक्टटेन्ट देण्यात आले. सदर बाळाच्या डोळ्याची ROP (Retinopathy of Prematurity) तपासणी आणि उपचार खासगी रुग्णालयामधून मोफत करून घेण्यात आले. या बालकाला Hydrocephalus असल्याचे निदान मेंदूची सोनोग्राफी करून करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रथमच सिरियल Lumber Tapping करून त्यावर उपचार करण्यात आला. आज ६० दिवसानंतर १४ मे रोजी डॉक्टरांच्या सल्ल्याने अर्भकाला (डिस्चार्ज) घरी सोडण्यात आले आहे. डिस्चार्ज वेळी बालकाचे वजन १६९० ग्रॅम होते. या बालकाच्या नातेवाईकांना नियोजित तारखाना तपासणीसाठी पुन्हा येण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. त्यासाठी संबंधित बालकाच्या नातेवाईकांना तपासणीच्या तारखांची फाईल तसेच आशा स्वयंसेवीकांच्या घरभेटी दरम्यान आशा कार्यकर्तीसाठी पाठपुरावा कार्ड देण्यात आले आहे. या बालकाच्या नातेवाईकांनी सर्व डॉक्टर व कर्मचारी यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!