मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात रिक्षा पलटी; देवधेच्या उपसरपंचांचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावरील धनावडे शेती फार्मजवळ अपघात : उपचारादरम्यान संजय मणचेकर यांची प्राणज्योत मालवली

लांजा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर धनावडे शेती फार्मजवळ आज (२१ ऑक्टोबर) दुपारी एकच्या सुमारास कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात देवधे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच तथा रिक्षाचालक संजय नारायण मणचेकर (वय ४२) यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेमुळे देवधे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, देवधे येथील रहिवासी संजय मणचेकर हे रिक्षा व्यवसाय करत होते. तसेच ते रिक्षा संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते असून देवधे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच म्हणूनही कार्यरत होते.

बुधवारी दुपारी ते लांजा येथून आपल्या रिक्षाने देवधे येथील घरी जेवणासाठी जात होते. त्यांची रिक्षा धनावडे शेती फार्मजवळ आली असता अचानक एक कुत्रा रस्त्यावर आडवा आला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात रिक्षावरील नियंत्रण सुटून रिक्षा पलटी झाली. या अपघातात संजय मणचेकर गंभीर जखमी झाले.

दरम्यान, त्यांच्या पाठीमागून दुसऱ्या रिक्षाने येणारे त्यांचे चुलत भाऊ प्रकाश जानू मणचेकर यांनी अपघात पाहताच तातडीने मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी जखमी संजय यांना प्रथम लांजा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

संजय मणचेकर यांच्या आकस्मिक निधनाने देवधे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे. या अपघाताचा पुढील तपास लांजा पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!