किल्ले रत्नदुर्गवर दसरा गडपूजन व शस्त्रपूजन सोहळा उत्साहात संपन्न
‘आधी तोरण गडाला, मग घराला!’ या संकल्पनेतून ऐतिहासिक वारसा जपण्याचा प्रेरणादायी उपक्रम

रत्नागिरी : गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा आणि महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती जतन करण्याच्या उद्देशाने गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य – रत्नागिरी विभागाच्या वतीने दसऱ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेला गडपूजन व शस्त्रपूजन सोहळा किल्ले रत्नदुर्ग येथील महादरवाजा परिसरातील हनुमान मंदिर येथे उत्साहात आणि पारंपरिक दिमाखात संपन्न झाला.
‘आधी तोरण गडाला, मग घराला!’ या प्रेरणादायी संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला प्रतिष्ठानच्या मावळे व रणरागिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर प्रथम गडाचे पूजन करून आपल्या ऐतिहासिक वारशाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यानंतर घरात सण साजरा करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
या सोहळ्याच्या निमित्ताने मावळे व रणरागिणींनी एकत्र येत किल्ले रत्नदुर्गाच्या महादरवाजा परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर ऐतिहासिक महादरवाजाला भव्य तोरण बांधून गडाला सणासुदीचे आणि मंगलमय स्वरूप प्राप्त करून देण्यात आले. पारंपरिक पद्धतीने गडपूजन व शस्त्रपूजन करून दसरा उत्सव साजरा करण्यात आला. या उपक्रमातून गड-किल्ल्यांचे संवर्धन, स्वच्छता आणि ऐतिहासिक वास्तूंबद्दलची सामाजिक बांधिलकी अधोरेखित करण्यात आली.
या कार्यक्रमाला जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष ॲड. मांडवकर आणि त्यांचे सहकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी या सोहळ्यात सहभागी होत उपक्रमाची शोभा वाढवली. मावळे व रणरागिणींच्या एकजुटीने आणि उत्साहपूर्ण सहभागाने संपूर्ण परिसरात शिवकालीन परंपरेची आणि ऐतिहासिक वारशाविषयीच्या अभिमानाची अनुभूती निर्माण झाली.
गड-किल्ले हे केवळ ऐतिहासिक वास्तू नसून महाराष्ट्राच्या शौर्याचे, स्वाभिमानाचे आणि अस्मितेचे प्रतीक आहेत. या वास्तूंचे जतन करणे, त्यांची स्वच्छता राखणे आणि पुढील पिढीपर्यंत त्यांचा इतिहास पोहोचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. याच विचारातून गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान सातत्याने विविध संवर्धनात्मक आणि जनजागृतीपर उपक्रम राबवत आहे.
दसऱ्यानिमित्त गडपूजन व शस्त्रपूजनाच्या माध्यमातून ऐतिहासिक वारशाचे स्मरण करत, प्रत्यक्ष कृतीतून गडसंवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. ‘आधी तोरण गडाला, मग घराला!’ या संकल्पनेतून गडांविषयीची निष्ठा, संस्कृतीचे जतन आणि संवर्धनाची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश या सोहळ्याने दिला. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक : रत्नागिरी विभाग अध्यक्ष दीपेश वारंग (9920905920), विभाग प्रमुख मयूर भितळे (7666708201), संपर्क प्रमुख तन्मय जाधव (8379012347)



