खेरशेत येथे यशोधरा महिला मंडळातर्फे युग प्रवर्तक महापुरुषांचा जयंती महोत्सव उत्साहात साजरा

आबलोली (संदेश कदम) : गेली तीन वर्षे कार्यरत असलेली यशोधरा महिला मंडळ, खेरशेत (ता. चिपळूण) या स्थानिक/मुंबई महिला संघटनेच्या पुढाकाराने याही वर्षी भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या युगप्रवर्तक महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव खेरशेत येथे भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. यावेळी महिला मंडळांच्या अध्यक्षा श्रीमती शैला बालाजी कदम, ॲड. स्मिता कदम, युवा छात्र समरीन जमालुद्दीन कादिरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या जयंती महोत्सवानिमित्त सकाळी पंचशील, पक्ष ध्वजाचे ध्वजारोहण महिला अध्यक्षा शैला कदम यांच्या समवेत चिपळूण कोर्टाच्या सरकारी वकील ॲड. स्मिता कदम व डीबीजे कॉलेजच्या युवाछात्रा समरीन कादिरी यांच्या हस्ते करण्यात आला. सामूहिक बुद्ध पूजापाठानंतर प्रमुख महिला पाहुण्यांसमवेत कार्यरत महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी युवाछात्रा समरीन कादिरी यांनी प्रथम संस्कृत भाषेतला श्लोक सादर केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच एका मुस्लिम महिलेला बुद्ध जयंतीच्या निमित्ताने विचारपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या लिखित संविधानाद्वारे दिल्या गेलेल्या मूलभूत अधिकारांमुळे ऋण व्यक्त करण्याची संधी प्राप्त झाल्याचे श्रीमती कादिरी यांनी सांगितले. ॲड. स्मिता कदम यांनी अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांपैकी आजच्या युगात शिक्षण, करियर आणि संविधान साक्षरता हे प्रत्येक समाज घटकांच्या मूलभूत गरजा आहेत. या फक्त व फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आम्हा महिलांना प्राप्त झाल्याचे नमूद केले. यावेळी हजरत मौलाना जमालुद्दीन कादिरी (इमाम कादिमी जामा मस्जिद, कालुस्ते) यांची विशेष उपस्थिती होती.
दुसऱ्या दिवशी चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती गावशाखा खेरशेत, धम्मभूषण विकास संघ खेरशेत, मुंबई (रजि.) सम्यक युवा मंच, खेरशेत या संस्थेच्या वतीने युगप्रवर्तक महापुरुषांचा जयंती महोत्सव स्थानिक संस्थेचे अध्यक्ष सुनील कदम यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुंबई संघटनेचे अध्यक्ष अनिल कदम, सम्यक युवा मंचचे संस्थापक ॲड. प्रशितोष कदम, सावर्डे विभागाचे अध्यक्ष काशीराम कदम, सावर्डे मुंबई विभागाचे अध्यक्ष शरद कदम, महिला मंडळांच्या अध्यक्ष शैला कदम आणि मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत या संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजय कदम यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झाला. या प्रसंगी उपस्थित चिपळूण जनजागृती संस्थेचे अध्यक्ष, बौद्धाचार्य व ज्ञानदीप लॉ कॉलेजचे विधी छात्र डॉ. संजय सावंत म्हणाले, “जगाला दया, क्षमा, शांती, अहिंसा व प्रज्ञा, शील, करुणा आणि स्वातंत्र्य , समता, बंधुत्वाचा अनेक पैलूंनी आदर्श निर्माण करणारा बौद्ध धम्म हा आजच्या घडीला एकमेव मानवतावादी, विज्ञानवादी धम्म म्हणून जगाच्या निर्देशनात आला आहे. म्हणूनच या आजच्या युद्धाच्या उंबरठ्यावर उभ्या असणाऱ्या विश्वाला बुद्धाची तत्त्वप्रणाली ही तारणारी आहे.” पुढे त्यांनी धम्म , आरोग्य, संविधान आणि रोजगार यावर प्रकाशझोत टाकून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
सायंकाळी लहान मुलांच्या, महिलांच्या कलागुणांना, मैदानी खेळातील विजेता स्पर्धकांना व शैक्षणिक क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तसेच वकील, डॉक्टर, इंजिनीअर अभ्यासक युवक युवतींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह , सन्मानपदक , भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी भाईसाहेब सावंत अध्यापक महाविद्यालय, सावर्डेचे प्राचार्य प्रा. रतन कांबळे म्हणाले, प्रत्येक बुद्धविहारे ही केवळ धम्म स्थळे न रहाता ती क्रांती केंद्र बनली पाहिजेत. क्रांती अर्थात बदल हा आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा युगातला भगवान बुद्धाच्या मनोवैज्ञानिक विचार धारेचे एक प्रमुख अंग आहे. ही विचारधारा बुद्ध धम्मातील युवा वर्गाने आत्मसात केली पाहिजे.”

यानंतर कोकणचे गाडगेबाबा शिवश्री काका जोयशी हे भटमुक्त भयमुक्त समाज या विषयावर बोलताना म्हणाले, “वेद, शास्त्र, पुराणे, स्मृती अध्याय ग्रंथाला नाकारणारे आणि अंधश्रद्धा, कर्मकांड आणि अनिष्ट रूढी परंपरा, बुवाबाजी, थोतांडावर प्रहार करणारे पहिले विज्ञानवादी वैज्ञानिक हे भगवान गौतम बुद्ध होते. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जात, धर्म, वर्ण, पंथ , गोत्र आधारलेल्या समाजव्यवस्थेला ‘संविधानाच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्य, बंधूभावाचा डोस देणारे पहिले मानवतावादी विचारसरणीचे डॉक्टर होते. भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आदर्श प्रणालीचा सर्वानी मनस्वी स्वीकार करणे ही एकमेव काळाची गरज आहे.”
युगप्रवर्तक महापुरुषांच्या जयंती यशस्वी करण्यासाठी स्थानिक/ मुंबई संस्थानी आणि पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. या दोन दिवसीय जयंती महोत्सवातील पहिल्या दिवसाचे सूत्रसंचालन आयु. साक्षी कदम (प्राथमिक शिक्षिका), आयु. प्रबोधिनी कदम (प्राथमिक शिक्षिका), धम्म उपासिका सोनाली कदम यांनी केले. तर दुसऱ्या दिवशीचे सूत्रसंचलन भाऊसाहेब तथा मिलिंद कदम, अनंत कदम व सामाजिक कार्यकर्ते संज्योत कदम यांनी केले.



