आम्ही शेतकरी- कृषीरत्नागिरी जिल्हा

कृषी विभागाकडून गुण नियंत्रणासाठी तक्रार निवारण हेल्पलाइन, भरारी पथके व तक्रार निवारण समित्यांची स्थापना

रत्नागिरी : कृषी विभागाकडून गुण नियंत्रणासाठी तक्रार निवारण हेल्पलाइन, भरारी पथके व तक्रार निवारण समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. निविष्ठांबाबत काही तक्रारी असल्यास तालुकस्तरीय तक्रार निवारण समितीकडे किंवा जिल्हा स्तरावरील तक्रार निवारण हेल्पलाइन क्रमांक ८८३०२६४३३५ ला संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.

जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५-२६ करीता बियाणे, खते व कीटकनाशके या कृषी निविष्ठांचा दर्जेदार तसेच सुरळीत व वेळेवर मुबलक पुरवठा होण्यासाठी कृषि विभाग सातत्याने प्रयत्न करत आहे. निविष्ठांबाबतच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी जिल्हा स्तरावर व प्रत्येक तालुका स्तरावर भरारी पथके स्थापन केलेली आहेत. जिल्हास्तरीय भरारी पथकाचे कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद हे पथक प्रमुख तर जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक हे सदस्य सचिव आहेत आणि तालुकास्तरीय भरारी पथकाचे तालुका कृषी अधिकारी हे पथक प्रमुख असून पंचायत समितीचे कृषी अधिकारी हे सदस्य सचिव आहेत.

प्रत्येक तालुक्यासाठी तक्रार निवारण समिति स्थापन करण्यात आली असून समिती खते, बियाणे व किटकनाशकांच्या प्राप्त तक्रारींची दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करेल. खरीप हंगाम २०२५-२६ साठी जिल्ह्यातील ५६०१० हे क्षेत्रासाठी एकूण ५१९१ क्विंटल बियाणे आवश्यक आहे. तसेच खतांचे एकूण १२९०७ मे. टन एवढे मंजूर आवंटण आहे. जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा सभेमध्ये पालकमंत्री महोदयांनी शेतकऱ्यांना बांधावर खते, बियाणे वितरण मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या असल्याने चालू खरीप हंगामात कृषी विभागामार्फत या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सद्य परिस्थितीत जिल्ह्यात बियाणे व खते पुरवठा सुरळीत सुरू झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रांमधून आवश्यक कृषी निविष्ठांची खरेदी करून ठेवावी. तसेच बियाणे, खते व किटकनाशके खरेदीचे पक्के बिल घ्यावे व निविष्ठा वापर करतांना सुरक्षा उपायांचे काटेकोर पालन करावे. निविष्ठांबाबत काही तक्रारी असल्यास तालुकस्तरीय तक्रार निवारण समितीकडे किंवा जिल्हा स्तरावरील तक्रार निवारण हेल्पलाइन क्रमांक ८८३०२६४३३५ ला संपर्क करावा, असे कृषी विभागाकडून शेतक-यांना आवाहन करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यानां कृषी सेवा केंद्रामध्ये तक्रार निवारण हेल्पलाइन क्रमांक, भाव फलक, साठा फलक, परवाना, तसेच “सदर कृषी सेवा केंद्रामध्ये लिंकिंग केले जात नाही ” अशा आशयाचा फलक दर्शनी भागात लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीमध्ये मुख्यमंत्री तसेच कृषीमंत्री यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या कृषी सेवा केंद्र चालकांकडून नियमांचे आणि दिलेल्या सूचनांचे उल्लंघन होईल त्यांच्यावर कृषी विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!