आरपीपी पालशेत विद्यालयात रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा

गुहागर : लहानपणी नकोशी वाटणारी शाळा आज मात्र हवीहवीशी वाटते. महाविद्यालयाची तर गोष्टच काही औरच असते. याचा प्रत्यय २५ मे रोजी तालुक्यातील पालशेत येथील रयत शिक्षण संस्थेचे श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (पालशेत) विद्यालयात संपन्न झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात आला. जवळपास २५ वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्रांनी शाळेत असताना केलेल्या गंमती-जमती, शिक्षकांनी केलेली शिक्षा, अशा अनेक आठवणींना उजाळा दिला.
इयत्ता १०वी (अ ) एसएससी बॅच-सन २००० माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक यांचे स्नेहसंमेलन २५ मे रोजी २५ वर्षांनंतर मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी या बॅचचे वर्ग शिक्षक मनोज जोगळेकर, शिक्षिका डी. डी. साठे, शिक्षिका एम. एम. ढेरे, शिक्षक श्री. पंडित, सी. वाय. कारेकर, श्री. सोहम, संतोष देवळे, वसंत मांडके, अशोक नागे, राजू नार्वेकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती फोटोचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून राष्ट्रगीताने सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. प्रारंभी विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक स्व. आग्रे सर आणि या बॅचचा आवडता मित्र विद्यार्थी राकेश दसम यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मनोज जोगळेकर यांनी भुषविले. सोहळ्याचे प्रास्ताविक महेश फटकरे यांनी करून कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. उपस्थित शिक्षकवृंद, कर्मचारी यांचे शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. सोहळ्याची आठवण म्हणून सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्हाचे वाटप करण्यात आले. विद्यार्थी मनोगतपर व्यक्त होताना वर्गातील लाडकी विद्यार्थिनी ज्योती रामाणे आणि लाडका विद्यार्थी अमित गोरीवले यांनी अप्रतिम असे भाषण करत सोहळ्याला रंगत आणली. विनोदी किस्से सांगून, सर्वांना हसवत ठेवून शाळेतील जुन्या गोष्टींना उजाळा दिला. या संमेलन सोहळ्यानिमित्त बॅचच्या वतीने शाळेला ३ पोडियम स्टेज स्टँड भेट देण्यात आले.

श्रीमती साठे यांनी मनोगत व्यक्त करत उत्तम मार्गदर्शन केले. पुन्हा पुन्हा एकत्र येत जावा असा संदेशही दिला. सोहम सर,पंडित सर,अशोक नागे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले, त्याचबरोबर अध्यक्षिय मनोगत व्यक्त करताना मनोज जोगळेकर यांनी पुढील आयुष्यात कश्याप्रकारे प्रवास करावा, मुलांना कशा प्रकारे शिक्षण दिले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सोहळ्याचे नियोजनाचे कौतुक करत सध्याच्या धावपळीच्या जीवनात एकमेकाला भेटण्यासाठी वेळच नाही आणि अशा वेळेला आपण एकत्र एकादा कार्यक्रम करणं म्हणजे खूप मोठी कसरतच आहे,अवकाळी मुसळधार पावसाचे आगमन त्याच्यामध्ये आपण सर्वांनी इथे येऊन हा सोहळा यशस्वी केलात त्याबद्दल तसेच आज शाळेला जी भेटवस्तू देण्यात आली त्याबद्दल आपले कौतुक करावे तेवढे थोडेच,जेव्हा जेव्हा शाळेला तुमची गरज असेल तेव्हा तुम्ही असंच एकत्र या असे आवाहन केले.
सोहळ्याचे सूत्रसंचालन वैजयंता केसरकर, सचिन मांडवकर यांनी केले. दुपारचे स्नेहभोजन आणि इतर नियोजित कार्यक्रम शांताई रिसॉर्ट मोडकाघर येथे पार पडले आणि खेळीमेळीच्या वातावरणात संमेलनाची सांगता झाली. या संमेलन सोहळ्याला सचिन मांडवकर, महेश घाणेकर, महेश फटकरे, परेश चव्हाण, दिनेश झिंबर, वसीम काद्री, केदार भोसले, अमित गोरिवले, रूपेश शेट्टी, विशाल विलणकर, ज्योती रामाणे, वीणा खेडेकर, संगिता सावंत, रूपाली काबंळे, स्वाती कुरधोंडकर, समिता पाडावे, वैजयंता केसरकर, जागृती तेरेकर आदी उपस्थित होते.



