मुख्य बातमीशैक्षणिक

विद्यार्थ्यांनी आवड,क्षमता व योग्यतेनुसार करिअर निवडावे : डॉ. अभिजित खानविलकर 

रत्नागिरी : “करिअर मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी, क्षमता आणि योग्यतेनुसार योग्य करिअर मार्ग निवडण्यास मदत करणे होय. हे मार्गदर्शन शिक्षण, प्रशिक्षण आणि व्यावसायिक संधींची माहिती देऊन, व्यक्तिमत्त्व विकास साधून आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करते. त्यामुळे करिअर मार्गदर्शन आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक जडणघडणीच्या महत्त्वाच्या टप्प्यात अन्य कोणत्याही व्यसनांच्या आहारी न जाता केवळ अभ्यास हेच व्यसन लावून घेऊन जर अभ्यास केला तर निश्चितच चांगले करिअर घडू शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यास धर्म पाळला पाहिजे त्यासाठी १०० टक्के योगदान दिले तर यश हमखासच मिळते,” असे प्रतिपादन डॉ. अभिजित खानविलकर यांनी केले.

मराठा संघ पालीच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यासाठी व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष मिलिंद सावंत, उपाध्यक्ष सुधीर सावंत, डॉ. अभिजीत खानविलकर, विजय देसाई, राजेश कदम, सचिन सावंत उपस्थित होते. यावेळी विभागातील पाली, नाणीज या हायस्कूलच्या दहावी, बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व राष्ट्रीय थ्रो बॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करून यश संपादन केलेल्या पाली पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव या सोहळ्यात करण्यात आला.

या कार्यक्रमाला मराठा संघाचे सचिव राजेंद्र सावंत, अभिषेक साळवी, खजिनदार उमेश सावंत, गजेंद्र सावंत, संचालक चंद्रशेखर सुर्वे, सुधर्म सावंत, शैलेश काटकर, शशिकांत सावंत, मंदार भोसले, सल्लागार शंकर सावंत, महेश सावंत, सतीश सावंत, मैथिली दळवी, माधवी सुर्वे व मान्यवर उपस्थित होते. मराठा संघातर्फे गतवर्षी वृक्षारोपण महिलांसाठी आरोग्य शिबिर, मोफत चष्मा वाटप व नेत्र तपासणी शिबिर असे सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत.

यावेळी अधिक मार्गदर्शन करताना डॉ. खानविलकर यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेतच आपल्या करियर निवडीची रूपरेषा निश्चित केली पाहिजे त्यानुसार पुढील करियर निवडीचा पर्याय निवडणे सोपे जाते. अनेकदा पदवीपेक्षा कर्तृत्वाने केलेले कामच मोलाचे ठरते त्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने मी हे करू शकतो आणि करणारच या प्रमाणे काम केले तर अशक्य असे काहीच नाही. आता आयएएस,आयपीएस, आयएफएस यासारख्या सनदी सेवा परीक्षा देणे हे सोपे झाले आहे. करिअर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता आणि योग्यतेवर विश्वास ठेवण्यास मदत करते.विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान प्रदान करते.विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्व, क्षमता आणि आवडींबद्दल अधिक जाणीव करून देते.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियदर्शनी रावराणे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!