मुख्य बातमी

सकाळी कामावर निघाली, दुपारी घरी पोहोचलीच नाही

रत्नागिरीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण

रत्नागिरी : शहरातील धनजीनाका परिसरातील नॉव्हेल्टी दुकानात कामाला असलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ८ जून रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने रत्नागिरी शहरात खळबळ उडाली असून, अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १३७ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुरुगवाडा येथील रहिवासी असलेले अलीसाहेब हसनमियों मुकादम (वय ४०, व्यवसाय मच्छीमारी) यांची मुलगी अजबा अलीसाहेब मुकादम ही दररोजप्रमाणे रविवारी (८ जून) सकाळी ९ वाजता धनजीनाका येथील नॉव्हेल्टी दुकानात कामावर गेली होती. नेहमीप्रमाणे ती दुपारी ३ वाजेपर्यंत घरी परत न आल्याने तिच्या कुटुंबियांना काळजी वाटू लागली.

वडिल अलीसाहेब मुकादम यांनी तात्काळ अजबा हिचे मालक अनसार मेमन यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी अजबा दुपारी २ वाजता दुकानातून निघून गेल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी मांडवी, भाट्ये, एस.टी. स्टँड परिसरात तिचा शोध घेतला. तसेच नातेवाईकांशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र अजबाचा कोणताही थांगपत्ता लागला नाही.

यामुळे, अलीसाहेब मुकादम यांना खात्री झाली की, त्यांच्या मुलीच्या अल्पवयीनपणाचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेले आहे. या प्रकरणी, त्यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात रात्री ११.३९ वाजता तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!