गुहागर पोलिसांमार्फत अवघ्या ४ तासांत मंदिर चोरी उघड
१०० टक्के मुद्देमाल हस्तगत : एकजण ताब्यात

रत्नागिरी : गोपनीय माहिती, मंदिर व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज याच्या आधारे गुहागर पोलिसांनी अवघ्या चार तासांत मंदिरात झालेल्या चोरीचा छडा लावला असून, सीसीटीव्हीत कैद झालेल्या एकाला १०० टक्के मुद्देमालासह ताब्यात घेण्यात यश आले आहे. सौरभ संतोष कदम (रा. मळण रोड, श्रृंगारतळी ता. गुहागर जि. रत्नागिरी) असे त्याचे असून, चोरी झाल्यापासून अवघ्या चार तासांतच आरोपी मुद्देमालासह गजाआड केल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
२ जून रोजी मध्यरात्री गुहागर पोलिस ठाणे हद्दीतील मौजे कोतळूक येथील श्री हनुमान मंदिर गाभाऱ्याचा दरवाजाचा कडी-कोयंडा एका अज्ञात इसमाने कोणत्या तरी हत्याराने उचकटून गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला आणि तेथे ठेवलेली लाकडी दानपेटी चोरून नेल्याची माहिती गुहागर पोलिस ठाण्यास मिळाली. याबाबत गुहागर पोलिस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, तसेच चिपळूणचे उपविभागिय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांनी लागलीच पोलिस ठाण्यातील एक पथक नेमले. गोपनीय माहिती, मंदिर व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याचा शोध घेऊन आरोपी सौरभ संतोष कदम (रा. मळण रोड, श्रृंगारतळी ता. गुहागर जि. रत्नागिरी) याला घटना घडल्यापासून अवघ्या ४ तासांतच ताब्यात घेतले.
संतोष याच्या अटकेबाबत पुढील कार्यवाही चालू असून, आरोपीने चोरून नेलेला १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा गुन्हा हा अवघ्या ४ तासांत उघडकीस आलेला असून आरोपीने यासारख्या मंदिर चोऱ्या व घरफोडीसारख्या गुन्हे यापूर्वी केलेले आहेत का, याबाबत अधिक तपास चालू आहे.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी जयश्री गायकवाड, उपविभागिय पोलिस अधिकारी चिपळूण राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन सावंत व गुहागर पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुजीत सोनावणे, म.पो.ना स्वामिनी नाटेकर, पोकॉ वैभव चौगले, पोकों प्रतीक रहाटे, पोकॉ प्रथमेश कदम, पोकॉ निखिल पाटील, म.पोकों सीमा मोरे यांनी केली.



