मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

शाश्वत पाणीसाठ्यांसाठी भूजल स्रोतांचे बळकटीकरण अत्यावश्यक : गटविकास अधिकारी गणेश मंडलिक

खेड : “भविष्यातील गरजांचा विचार करता शाश्वत पाणीसाठ्यांसाठी भूजल स्रोतांचे बळकटीकरण अत्यंत आवश्यक आहे” असे मत खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांनी व्यक्त केले. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत स्रोत बळकटीकरण आणि शाश्वतीकरण’ या दोन दिवसीय प्रशिक्षणाच्या खेड येथील सहाव्या व सातव्या तुकड्यांच्या प्रशिक्षण शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

हे प्रशिक्षण जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग आणि जेपीएस फाऊंडेशन लखनऊ यांच्या संयुक्त विद्यमाने भरणे नाका येथील काळकाई सभागृह आणि गणेश मंगल कार्यालय येथे ९ ते १२ जून या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. याच्या पहिल्या दोन तुकड्यांच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ ९ जून रोजी पार पडला होता. तर उर्वरित दोन तुकड्यांच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ काल (११ जून) गटविकास अधिकारी यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

याच वेळी पाण्याच्या तपासणीसाठी राज्य शासनातर्फे ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या क्षेत्रीय तपासणी संचांच्या (फील्ड टेस्टिंग किट) वितरणाचा देखील प्रातिनिधिक स्वरूपात शुभारंभ करण्यात आला. तसेच ‘हर घर जल’ आणि ‘माझी वसुंधरा’ व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मॉडेल व्हिलेज अंतर्गत घोषित ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र आणि वडाच्या झाडाची रोपे देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी , विस्तार अधिकारी ग्रामपंचायत मुख्य संसाधन केंद्रांचे प्रतिनिधी मंगेश नेवगे, अर्चना पाटील, सत्यवान भरते, शुभांगी देसाई आदी उपस्थित होते. या प्रशिक्षणासाठी संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, जलसुरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षण समन्वयक मंगेश नेवगे यांनी प्रास्ताविक केले आणि आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!