शहर विकासाबाबत सूचना आणि सध्या भेडसावत असलेल्या समस्या नागरिकांनी लेखी स्वरूपात द्याव्या
मनसेचे शहरवासीयांना आवाहन : मोर्चानंतर मनसे रत्नागिरी शहरात ॲक्शन मोडवर

रत्नागिरी : अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराची वरात नगरपालिकेच्या दारात या मोर्चानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पालिकेच्या कराभराविरोधात कमालीची कार्यरत झाली आहे. आधी मोर्चा मग मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रारींचा पाढा मग राजीवडामध्ये फिल्डवर. आणि आता त्याही पुढे जाऊन रत्नागिरीमधील तमाम करदात्या नागरिकांना शहरातील तक्रारी लेखी स्वरूपात देण्याचे आवाहन केले आहे.
शहरात वावरत असताना नागरिकांना अनेक गैरसोयींचा अनुभव येतो. बहुतेक वेळेस त्यावर “रोज मरे त्याला कोण रडे” या उक्तीप्रमाणे नागरिक दुर्लक्ष करतात; पण त्यावर मनसेच्या महेंद्र गुळेकर, सचिन शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील अडचणी किंवा गैरसोई आम्हाला लेखी स्वरूपात मनसे जिल्हा कार्यालय, नाकोडा कॉम्पलेक्स, गाळा नंबर १५, आठवडा बाजार, रत्नागिरी या पत्त्यावर कळवाव्यात त्यावर मनसेमार्फत आवाज उठवला जाईल.
सोबतच शहर विकासाबाबतीत नागरिकांच्या ज्या काही सूचना असतील किंवा संकल्पना असतील त्याही लेखी स्वरूपात द्यावे मनसेच्या शहर विकास आराखड्यामध्ये त्याचा नक्कीच समावेश करू, असे देखील आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेतल्या असून, या निवडणुकीत संपूर्ण ताकतीने उतरण्याची तयारी करत आहेत. या निमित्ताने शहरवासियांना नगरपालिकेत अजून एक सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे.



