मुख्य बातमी

चिपळूणच्या सैनिकी वसतिगृहात पालक मेळावा व आरोग्य शिबिर

चिपळूण : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रत्नागिरी यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत चिपळूण येथील सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहात २ ऑक्टोबर रोजी पालक मेळावा आणि मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास ४१ पालक व ५२ विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते, तर ३७ जणांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला.

सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक राहुल काटे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा पार पडला. यावेळी वसतिगृह अधीक्षक योगेश बने आणि अधीक्षिका सविता गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, शिक्षणाचे महत्त्व, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि उत्तम आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, व्यक्तिमत्त्व विकास आणि वसतिगृहातील सोयी-सुविधांविषयी पालकांना माहिती दिली. काही पालकांनी मनोगत व्यक्त करून वसतिगृहाच्या शिस्तबद्ध कामकाजाचे व उपक्रमांचे कौतुक केले. या उपक्रमामुळे पालक, विद्यार्थी आणि प्रशासन यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ झाले.

कल्याण संघटक राहुल काटे यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भारतीय सैन्यदलात भरती होण्याच्या विविध संधींविषयी मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्रातील भरतीपूर्व प्रशिक्षण देणाऱ्या प्रमुख शासकीय व नामांकित संस्थांची सविस्तर माहिती दिली.

याप्रसंगी ‘जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, रत्नागिरी’ यांच्या सहकार्याने आरोग्य शिबिर राबविण्यात आले. संस्थेचे प्रतिनिधी आनंद दिंगणकर यांनी संस्थेच्या वतीने चिपळूण येथे सुरू असलेल्या सैन्यदल, पोलीस, सरळसेवा आणि एमपीएससी भरतीपूर्व प्रशिक्षण उपक्रमांची माहिती दिली. शिबिरादरम्यान प्राथमिक आरोग्य तपासणी करून सुदृढ शरीर, निरोगी मन व सक्षम जीवनशैलीबाबत प्रबोधन करण्यात आले.

वसतिगृह अधीक्षक योगेश बने व अधीक्षिका सविता गायकवाड यांच्या उत्तम नियोजनाखाली पार पडलेल्या या संयुक्त उपक्रमाचे उपस्थित पालकांनी मनापासून स्वागत करत आयोजकांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!