महाराष्ट्रमुख्य बातमी

अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्रात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

राज्यात आज शासकीय सुट्टी; पुणे बंद

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा आघात करणाऱ्या घटनेनंतर राज्य सरकारकडून आज शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली असून राज्यभरात तीन दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. अजित पवार यांच्या निधनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

अजित पवार यांच्यासारखे नेतृत्व तयार होण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो. महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारे नेतृत्व अशा प्रकारे निघून जाणे हे अविश्वसनीय असून मनाला चटका लावणारे आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असल्यामुळे पुण्यातही दुकाने बंद ठेवून शोक व्यक्त करण्यात आला आहे.

“माझ्यासाठी एक दमदार, दिलदार मित्र गमावला आहे. त्यांच्या कुटुंबावर हा प्रचंड मोठा आघात आहे,” असे सांगताना मुख्यमंत्री गहिवरले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच बारामतीकडे रवाना होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दूरध्वनीवरून घटनेबाबत चर्चा झाली असून त्यांनीही या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

“माझे सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांच्याशी बोलणे झाले आहे. संपूर्ण कुटुंब बारामतीला पोहोचल्यानंतर त्यांच्या संमतीने पुढील सर्व निर्णय घेतले जातील. आज शासकीय सुट्टी देण्यात आली असून राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात येत आहे. पुढील सर्व बाबींची माहिती लवकरच दिली जाईल,” असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

अजित पवार यांचे जाणे हे कधीही भरून न निघणारे नुकसान असून, अशा लोकनेत्यांच्या जाण्याने निर्माण होणारी पोकळी भरून काढणे अत्यंत कठीण असते. इतक्या जवळून, संघर्षातून एकत्र काम केल्यामुळे या घटनेवर विश्वास ठेवणेही कठीण जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अजित पवार यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अजित पवार हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ जपणारे लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची सखोल जाण आणि गरीब-वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक आणि दुःखद असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!