मुख्य बातमी

ब्राऊन हॅरॉईनसदृश्य अमली पदार्थ विक्री करणारा ताब्यात

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची अमली पदार्थविरोधात धडक कारवाई

रत्नागिरी : स्थानिक गुन्हा अन्वेषण पथक शहरात गस्त घालत असताना ६ एप्रिल रोजी जयस्तंभ येथील एका हॉटेलच्या शेजारी एक इसम संशयास्पद हालचाली करत असल्याचे निदर्शनास आले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे ब्राऊन हॅरॉईन अमली पदार्थाच्या एकूण १५ पुड्या व इतर साहित्य सापडले. त्याला ताब्यात घेण्यात आले असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिल अशरफ शेख (वय ३० वर्ष, रा. गोळप सडा, ता.जि. रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे.

जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांना प्रतिबंध व कारवाई करण्याच्या अनुषंगाने धडक कारवाई करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार यांची विविध पथके शहरात गस्त घालत आहेत.

स्थानिक गुन्हा अन्वेषण पथक शहरात गस्त घालत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ६ एप्रिल रोजी जयस्तंभ येथील एका हॉटेलच्या शेजारी संशयित आरोपी आदिल अशरफ शेख (वय ३० वर्ष, रा. गोळप सडा, ता.जि. रत्नागिरी) हा आपल्या दुचाकी वाहनावर बसून संशयास्पद हालचाली करत असल्याचे निदर्शनास आले. म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याची चौकशी करून त्याच्या ताब्यातील पिशवी पंचाच्या समक्ष तपासली. त्यावेळी त्यात ब्राऊन हॅरॉईन अंमली पदार्थाच्या एकूण १५ पुड्या व इतर साहित्य मिळून आले. आदिल शेख याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. १३१/२०२५ एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

आदील याच्याकडून ब्राऊन हॅरॉईनसदृश्य अमली पदार्थाच्या १५ पुड्या व १ दुचाकी वाहन असा मिळून एकूण ७७ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. ढेरे, सहा. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोहवा शांताराम झोरे, बाळू पालकर, दीपराज पाटील व गणेश सावंत यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!